टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२३ सप्टेंबर) नागपुरात खेळला गेला. पावसामुळे मैदान ओले होते. ते खेळण्यायोग्य बनवण्यासाठी बराच वेळ लागला. त्यामुळे हा सामना ८-८ षटकांचा खेळवण्यात आला.
दरम्यान, या सामन्यापूर्वीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी हेअर ड्रायरने कोरडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकारानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) प्रचंड ट्रोल व्हावे लागले आहे.
बीसीसीआय ट्रोल
यानंतर संतापलेल्या एका युजरने लिहिले, 'बीसीसीआयला थोडी लाज वाटली पाहिजे! तुमच्याकडे पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्थाही नाही. सगळा पैसा कुठे खर्च होतो?
व्हायरल फोटो जुने, नागपुरातील नाहीत
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फाटो जुने आहेत. हे फोटो २३ सप्टेंबरचे नागपूरातील नसून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात नोव्हेंबर २०२० मध्ये गुवाहाटीत झालेल्या सामन्यातील आहेत. त्या सामन्याच्या दरम्यान आऊटफिल्ड वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे तेव्वाही BCCI वर प्रचंड टीका झाली होती.
फोटो व्हायरल का झाले?
क्रिकेट चाहते २०-२० षटकांचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. महागाचे तिकीट काढून त्यांचे पैसे वसूल झाले नाहीत. अशा परिस्थितीत चाहत्यांना राग येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी असे फोटो शेअर करून बीसीसीआयला प्रचंड ट्रोल केल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरा सामना भारताने जिंकला
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून फिंचने १५ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. फिंचने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. तर मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शेवटच्या तीन षटकात ४४ धावा कुटल्या. वेडने २० चेंडूत ४३ धावा ठोकल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
प्रत्युत्तरात भारताने ७.२ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. कर्णधार रोहित शर्माने २० चेंडूत ४६ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याचवेळी दिनेश कार्तिकने आठव्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून सामना संपवला. कार्तिक २ चेंडूत १० धावा करून नाबाद राहिला.
संबंधित बातम्या