मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS Playing 11: आज जिंकावच लागणार, भुवी की यादव संघाबाहेर कोण जाणार?
IND vs AUS
IND vs AUS

IND vs AUS Playing 11: आज जिंकावच लागणार, भुवी की यादव संघाबाहेर कोण जाणार?

23 September 2022, 14:43 ISTRohit Bibhishan Jetnavare

India vs Australia 2nd T20 Playing 11 Prediction: मोहालीत पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. त्यामुळे नागपुरातील आजचा सामना भारतासाठी करो या मरोचा असणार आहे. या सामन्यातून जसप्रीत बुमराहचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे उमेश यादवला संघाबाहेर बसावे लागणार आहे. प्लेईंग इलेव्हनमध्ये हाच एकमेव बदल असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी नागपुरात होणार आहे. मालिकेतील आव्हान टिकण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. टीम इंडियाही यासाठी सज्ज झाली आहे. दुसऱ्या T20 सामन्यात उमेश यादवच्या जागी जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मध्ये सामील केले जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जसप्रीत बुमराहला इंग्लंड दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून बुमराह टीम इंडियाच्या बाहेर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तो संघात नव्हता. यानंतर बुमराहच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात होते.

मात्र, जसप्रीत बुमराह दुसऱ्या टी-20 सामन्यात प्लेइंग ११ चा भाग असणार आहे, असे संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात २ षटकात २७ धावा देणाऱ्या उमेश यादवला संघाबाहेर बसावे लागणार आहे.

बुमराहच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी मजबूत होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात २०८ धावांची मोठी धावसंख्या उभारूनही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताच्या पराभवाचे कारण वेगवान गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी होती.

नागपुरात गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची

विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची विकेट मोहालीपेक्षा वेगळी असेल. येथे विकेट संथ असण्याची शक्यता आहे. अशावेळी गोलंदाजांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. संध्याकाळी दवचा प्रभाव पाहता, कोणत्याही संघासाठी धावांचा पाठलाग करणे चांगले राहिल.

दोन्ही देशांची संभाव्य प्लेइंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (क), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.