आशिया चषकात २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने विजय मिळवला. मात्र, दुबईत झालेल्या सामन्यादरम्यान एका भारतीय चाहत्याला पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी परिधान करुन सामना पाहणे चांगलेच महागात पडले आहे. संयम जैस्वाल असे या चाहत्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील बरेलीचा रहिवासी आहे.
पाकिस्तानी जर्सीतील त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तो लोकांच्या निशाण्यावर आला आहे. त्याच्या कुटुंबीयांना धमक्या मिळू लागल्या असून त्याला 'देशद्रोही' म्हटले जावू लागले आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, डीजीपी, एडीजी, आयजी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यां ट्विटवरुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
स्टेडियमवर पोहोचण्यास उशीर, भारतीय जर्सी मिळाली नाही
क्रिकेटच्या वेडायपायी संयम जैस्वालने बरेलीहून थेट दुबई गाठली. भारत-पाकिस्तान सामन्यादिवशी स्टेडियमवर पोहोचायला त्याला थोडासा उशीर झाला. त्यामुळे संयमला भारतीय क्रिकेटची जर्सी मिळाली नाही. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये त्याने भारतीय संघाच्या जर्सी शोधल्या, पण त्या सर्व विकल्या गेल्या होत्या. त्याठिकाणी पाकिस्तानची जर्सी विकल्या जात होत्या. संयमने खरेदी करून ती परिधान केली.
फोटो क्रॉप करुन व्हायरल
सामन्यानंतर त्याने या जर्सीसह फोटोही काढले. ते व्हायरल झाल्यानंतर त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत संयमच्या एका हातात पाकिस्तानचा झेंडा आणि दुसऱ्या हातात तिरंगा आहे. मात्र, संयमाचा हा फोटो फक्त पाकिस्तानच्या ध्वजासह क्रॉप करून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. हे चित्र बरेलीतील लोकांपर्यंत पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या मिळू लागल्या. काहींनी त्याला ट्विटमध्ये टॅग केले तर काहींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि भाजप नेत्यांकडे तक्रार करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संयम जैस्वालचे स्पष्टीकरण
संयमने या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, “इतरांप्रमाणे मीही भारतीय संघाचा समर्थक आहे. मी माझ्या मित्रांसोबत स्टेडियममधून सामना पाहण्याचा बेत केला होता. मला त्यादिवशी खूप शोधूनही भारताची जर्सी मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तानी जर्सी घालून मी हिंदूस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊन पाकिस्तानी समर्थकांना चिडवेन असे ठरवले होते. पण आता हे माझ्याच अंगलट आले आहे”.
संबंधित बातम्या