भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय महिला संघाने समी फायनलमध्ये जपानचा २-० असा धुव्वा उडवला. आता महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना चीनशी होईल. चीनने पहिल्या सेमीफायनलमध्ये मलेशियाचा ३-१ असा पराभव केला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीची ही स्पर्धा राजगीर, बिहार येथे खेळली जात असून भारत विरुद्ध चीन यांच्यातील अंतिम सामना २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
जपानविरुद्धच्या रोमहर्षक उपांत्य फेरीच्या सामन्यात नवनीत कौर आणि लालरेमसियामी यांनी शेवटच्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करत टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
हा उपांत्य फेरीचा सामना इतका रोमांचक होता की, प्रत्येकी १५ मिनिटांचे पहिले तीन क्वार्टर गोलशून्य राहिले, पण शेवटच्या १५ मिनिटांत जपानचा संघ दबावाखाली आला. शेवटचा क्वार्टर सुरू झाल्यानंतर अवघ्या २ मिनिटांनी भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, ज्याचे नवनीत कौरने गोलमध्ये रूपांतर करत टीम इंडियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
सामना संपायला फक्त ४ मिनिटे उरली होती, तेव्हा ५६व्या मिनिटाला लालरेमसियामीने जपानच्या गोलरक्षकाला चकवले आणि गोल करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
आता महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. सामना २० नोव्हेंबरला बिहारच्या राजगीरमध्ये होणार आहे. एकीकडे भारताने जपानचा २-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर चीनने मलेशियाचा ३-१ असा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला.
महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघ पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असून टीम इंडियाने आतापर्यंत तीनदा हे विजेतेपद पटकावले आहे.
२०२३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये जपानचा ४-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. तर चीनला गेल्या तीन वेळा तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, मात्र यावेळी अंतिम फेरीत प्रवेश करण्यात चीनला यश आले आहे.