मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND W vs IRE W T20 Highlights : भारत उपांत्य फेरीत, डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडचा ५ धावांनी पराभव

IND W vs IRE W T20 Highlights : भारत उपांत्य फेरीत, डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडचा ५ धावांनी पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 20, 2023 06:08 PM IST

Indw vs Irew Women's T20 WC Highlights : महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये आज (२० फेब्रुवारी) भारताचा सामना आयर्लंडशी झाला. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. इंग्लंडचा संघ यापूर्वीच ग्रुप-बी अर्थात भारताच्या गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.

IND W vs IRE W T20 Highlights
IND W vs IRE W T20 Highlights

IND W vs IRE W T20 World Cup Score News in marathi : महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये आज (२० फेब्रुवारी) भारताचा सामना आयर्लंडशी झाला. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. इंग्लंडचा संघ यापूर्वीच ग्रुप-बी अर्थात भारताच्या गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.

IND W vs IRE W T20 Updates

भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला

भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ग्रुप-बी मधील शेवटच्या सामन्यात आयर्लंडचा ५ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. या गटातून इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

सध्या इंग्लंड ब गटातील गुणतालिकेत तीन सामन्यांत तीन विजय आणि ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांना शेवटचा गट सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. अशा स्थितीत अव्वल स्थानावर असताना इंग्लंड उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित आहे. त्याचबरोबर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठेल. इंग्लंडचा नेट रन रेट +१.७७६ आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतरही इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर राहू शकतो. त्याच वेळी, भारताचा नेट रन रेट +०.२९० आहे. तर आता ब गटातील वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि पाकिस्तानचे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत पोहोचला तर अंतिम चारमध्ये त्यांचा सामना जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाशी होईल. भारतासाठी अंतिम फेरीचा मार्ग सोपा असणार नाही. आतापर्यंत ‘अ’ गटातील केवळ ऑस्ट्रेलियन संघ चारपैकी चार सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. 

त्याचवेळी दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस आहे. ‘अ’ गटातील दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाची उपांत्य फेरीत इंग्लंडशी गाठ पडेल. पहिला उपांत्य सामना २३ फेब्रुवारीला तर दुसरा उपांत्य सामना २४ फेब्रुवारीला होणार आहे. २६ फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

भारतीय महिला क्रिकेट संघाने पाचव्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी भारतीय संघ २००९, २०१०, २०१८ आणि २०२० मध्ये अंतिम चारमध्ये पोहोचला होता. २०२० मध्ये म्हणजेच मागील वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया उपविजेती ठरली होती. अंतिम फेरीत त्यांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.

सामन्यात काय घडलं?

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने आयर्लंडसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ६ गडी गमावून १५५ धावा केल्या होत्या. भारताकडून स्मृती मानधनाने ५६ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघाने ८.२ षटकांत २ गडी गमावून ५४ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार भारत ५ धावांनी पुढे होता. म्हणजेच आयर्लंडला हा सामना जिंकायचा असेल तर ८.२ षटकात ५९ धावा करायच्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडचा संघ ५ धावांनी मागे होता. त्यामुळे सामना भारताने जिंकला.

IND vs IRE T20 Live: पावसामुळे सामना थांबला

पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. आयर्लंडने ८.२ षटकांत २ गडी गमावून ५४ धावा केल्या आहेत. आता पाऊस थांबला नाही आणि डकवर्थ लुईस नियम लागू झाला तर भारत या नियमानुसार ५ धावांनी पुढे आहे. म्हणजेच आयर्लंडला हा सामना जिंकायचा असेल तर ८.२ षटकात ५९ धावा करायच्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडचा संघ ५ धावांनी मागे आहे.

IND vs IRE T20 Live: सात षटकांनंतर आयर्लंड ४८/२

सात षटकांनंतर आयर्लंडने दोन गडी गमावून ४८ धावा केल्या आहेत. गॅबी लुईस २० चेंडूत २९ आणि कर्णधार लॉरा डेलेनी १७ चेंडूत १५ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये ४५ हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.

IND vs IRE T20 Live : भारताच्या १५५ धावा

भारताने आयर्लंडसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ६ गडी गमावून १५५ धावा केल्या. स्मृती मानधनाचे शतक थोडक्यात हुकले. तिने ५६ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील ही तिची सर्वोत्तम खेळी आहे.

मानधान व्यतिरिक्त इतर कोणतीही भारतीय फलंदाज विशेष काही करू शकली नाही. मानधनाने शेफालीसोबत सलामीच्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. शेफाली २९ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २४ धावा करून बाद झाली. यानंतर मंधानाने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली.

आयर्लंडची कर्णधार एल डेलानीने १६व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हरमनप्रीत २० चेंडूत १३ धावा करून बाद झाली. त्याचवेळी रिचाला खातेही उघडता आले नाही. यानंतर मंधानाने षटकारांसह टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २२ वे अर्धशतक झळकावले. या विश्वचषकातील तिचे हे दुसरे अर्धशतक ठरले.

१९व्या षटकात मंधाना झेलबाद झाली. तर डावाच्या शेवटच्या चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्सही बाद झाली. तिला १२ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १९ धावा करता आल्या. पूजा वस्त्राकर २ धावा करून नाबाद राहिली.

तर आयर्लंडकडून डेलानीने ३ आणि प्रेंडरगास्टने २ गडी बाद केले. आर्लेन केलीला एक विकेट मिळाली.

IND vs IRE T20 Live : स्मृती मानधना बाद

स्मृती मानधना ५६ चेंडूत ८७ धावा करून बाद झाली. तिने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. स्मृती ओरला प्रेंडरगास्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली.

IND vs IRE T20 Live: हरमनप्रीत आणि रिचा बाहेर

भारताला १६व्या षटकात दोन मोठे झटके बसले. डेलेनीने षटकाच्या पाचव्या चेंडूवर हरमनप्रीत कौर झेलबाद झाली. तिने २० चेंडूत १३ धावा केल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर रिचा घोषही झेलबाद झाली. रिचाला खातेही उघडता आले नाही. १६ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद ११५ अशी आहे. सध्या स्मृती मानधना ६९ आणि जेमिमाह रॉड्रिग्स क्रीजवर आहेत.

IND vs IRE T20 Live: स्मृती मानधनाचे अर्धशतक

भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २२वे अर्धशतक झळकावले. तिने आयर्लंडविरुद्ध षटकार ठोकून ४० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या स्पर्धेतील तिचे हे दुसरे अर्धशतक आहे. १४ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर ९५ अशी आहे. सध्या मंधाना ४० चेंडूत ५३ धावांवर असून कर्णधार हरमनप्रीत कौर १५ चेंडूत ११ धावा करत आहे.

IND W vs IRE W T20 Live Score शेफाली वर्मा बाद

१०व्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. शेफाली वर्मा कर्णधार लॉरा डेलेनीच्या गोलंदाजीवर झेल बाद झाली. अॅमी हंटरने शेफालीचा झेल पकडला. शेफालीने २९ चेंडूत २४ धावा केल्या. तिने ३ चौकार मारले. भारताच्या ६२ धावा झाल्या आहेत. दुसरी सलामीवीर स्मृती मानधना ३३ धावांवर खेळत आहे. हरमनप्रीत कौर फलंदाजीस आली आहे.

IND vs IRE T20 Live : मानधनाचा झेल सुटला

८ षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता ५३ धावा केल्या आहेत. सध्या शेफाली वर्मा २२ चेंडूत १८ धावांवर खेळत असून स्मृती मानधना २६ चेंडूत ३२ धावांवर खेळत आहे. आठव्या षटकात मानधनाचा सोपा झेल सुटला.

IND vs IRE T20 Live: दोन्ही संघ खालीलप्रमाणे 

आयर्लंड

एमी हंटर, गेबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, लुईस लिटल, लॉरा डेलेनी (कर्णधार), आर्लेन केली, मेरी वॉल्ड्रॉन (विकेटकीपर), लेआ पॉल, कारा मरे, जॉर्जिना डेम्पसी.

भारत

स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग.

IND vs IRE T20 Live: भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हरमनने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. राधा यादव हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी देविका वैद्यचा संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs IRE T20 Live : भारतासाठी सेमी फायनलचं समीकरण

भारतासाठी उपांत्य फेरीचे समीकरण अगदी सोपे आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला इंग्लंडसह उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. अशा स्थितीत वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान स्पर्धेबाहेर होतील. भारत हरला तर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांपैकी एकाला उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळेल. एक पराभव टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेर काढू शकतो.

वेस्ट इंडिजचे भवितव्य आता त्यांच्या हातात नाही, जरी त्यांनी रविवारी पाकिस्तानला तीन धावांनी पराभूत केले असले तरी ते तिसऱ्या स्थानावर आहेत. जर आयर्लंडने भारताला हरवले तर पाकिस्तानला पुढे जाण्यासाठी हिथर नाइटच्या इंग्लंडला पराभूत करावे लागेल. भारतापेक्षा पाकिस्तानचा नेट रन रेट चांगला आहे.

WhatsApp channel