
भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा १६ धावांनी पराभव करत मालिका ३-० अशी जिंकली. महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा हा शेवटचा सामना होता. झुलनची दिवसभर चर्चा होती, मात्र सामन्याच्या शेवटी दीप्ती शर्मा चर्चेत आली. लॉर्ड्सवर भारताची दिग्गज ऑलराऊंडर दिप्ती शर्माने इंग्लंडची फलंदाज शार्ली डीनला मांकडिंगद्वारे धावबाद केले. यावर बरीच चर्चा रंगली.
४४ व्या षटकांत नेमकं काय घडलं
इंग्लंडच्या डावाच्या ४४ व्या षटकात एक प्रसंग घडला. हे षटक भारताची दिग्गज ऑलराऊंडर दिप्ती शर्मा टाकत होती. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी अजून १६ धावा करायच्या होत्या. शार्ली डीन ही शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिससह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. नॉन स्ट्रायकरच्या एंडला उभी असलेली डीन त्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर पडली. त्यामुळे दीप्तीने चाणाक्षपणा दाखवत बेल्स उडवल्या.
त्यानंतर भारतीय खेळाडूंनी धावबाद (मांकडिंग) साठी अपील केले. यावेळी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. रिप्लेत डीनने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी डीनला धावबाद घोषित केले. धावबाद झाल्यानंतर भारतीय संघाने जल्लोष सुरू केला . तर इंग्लिश खेळाडू यामुळे प्रंचड नाराज दिसले. डीन आणि फ्रेया डेव्हिस यांच्या डोळ्यात अश्रूही आले होते.
इंग्लिश कर्णधाराने भारताच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह केले
इंग्लंडच्या पराभवानंतर जेव्हा कर्णधार एमी जोन्सला या रनआउटबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने भारताच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ती म्हणाली, ‘‘सामना अशाप्रकारे संपणे दु:खद आहे. याबद्दल प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. मी या नियमाची चाहती नाही. भारतीय संघ याकडे कसे पाहतो हे मला माहीत नाही.”
एमी जोन्सच्या या वक्तव्यानंतर लॉर्ड्सवरील इंग्लंडच्या चाहत्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
हरमनप्रीतने दिले चोख उत्तर
सामन्यानंतर हरमनप्रीत कौरला या विकेट संदर्भात विचारण्यात आले. मात्र, ती उत्तर देण्यास टाळाटाळ करत होती. पण तिला त्या विकेटसंदर्भात पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी हरमनप्रीतचा संयम सुटला. यावेळी तिने चोख उत्तर दिले. हरमनप्रीत म्हणाली, “मला वाटले होते की तुम्ही पहिल्या ९ विकेट्सबद्दल विचाराल कारण ते घेणेही सोपे नव्हते. आम्ही काही चुक केली आहे असे मला वाटत नाही. मुळात यावरून क्रिकेटपटू म्हणून आपण किती सतर्क आहोत, हे दिसून येते. मी माझ्या खेळाडूला पाठिंबा देईन".
संबंधित बातम्या
