मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND W vs AUS W T20 Highlights : मोठ्या सामन्यात टीम इंडिया पुन्हा ढेर, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

IND W vs AUS W T20 Highlights : मोठ्या सामन्यात टीम इंडिया पुन्हा ढेर, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 23, 2023 04:27 PM IST

IND W vs AUS W T20 WC Semi-Final Highlights : महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ धावांनी पराभव केला. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघ सातव्यांदा या स्पर्धे्च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

IND W vs AUS W T20 Semi Final Highlights
IND W vs AUS W T20 Semi Final Highlights

IND W vs AUS W T20 WC Semi-Final Highlights :  महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ धावांनी पराभव केला. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघ सातव्यांदा या स्पर्धे्च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

IND W vs AUS W T20 WC Semi-Final Updates

ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला

भारतीय महिला क्रिकेट संघाचे T20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ धावांनी पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून १७२ धावा केल्या. भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण हा चर्चेचा विषय राहिला. टीम इंडियाने मेग लॅनिंग आणि बेथ मुनी यांचे सोपे झेल सोडले. त्याचा परिणाम असा झाला की मुनी आणि लॅनिंगने मोठी खेळी खेळली. मुनीने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. याशिवाय लॅनिंगने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळताना ३४ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. ऍशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावांची खेळी खेळली.

प्रत्युत्तरात भारतीय संघाला २० षटकांत ८ गडी बाद १६७ धावाच करता आल्या. एका टप्प्यावर भारताने १४ षटकांत ४ गडी गमावून १२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाला ३६ चेंडूत केवळ ४९ धावांची गरज होती. कर्णधार हरमनप्रीत कौर ३० चेंडूत ४३ आणि ऋचा घोषने १४ धावांवर खेळत होत्या. यानंतर पुढील षटकात हरमनप्रीतने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच षटकात ती विचित्र पद्धतीने धावबाद झाली. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. एक धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेताना ती बॅट क्रीजमध्ये ठेवताना मध्येच अडकली. हरमनप्रीतने एकाकी झुंज देताना ३४ चेंडूत ५२ धावा केल्या.

हरमनप्रीत बाद होताच पुढच्याच षटकात खराब शॉट खेळून रिचाही बाद झाली. १९व्या षटकात स्नेह राणा बाद झाल्याने भारताच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. त्यावेळी दीप्ती शर्मा आणि राधा यादव क्रीजवर होते. मात्र, टीम इंडियाला केवळ १० धावा करता आल्या आणि ५ धावांनी सामना गमवावा लागला. हरमनप्रीतशिवाय जेमिमाने २४ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. शेफाली वर्मा, स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया या स्टार्स अपयशी ठरल्या.

ऍशले गार्डनरने दोन बळी घेतले. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

IND W vs AUS W Live : हरमनप्रीत विचित्र पद्धतीने धावबाद 

भारताला १५व्या षटकात पाचवा धक्का बसला. कर्णधार हरमनप्रीत कौरने तिची विकेट गमावली. दुसऱ्या धावेदरम्यान ती आपली बॅट क्रीजमध्ये ठेवताना मध्येच अडकली आणि धावबाद झाली. बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौर खूपच निराश दिसत होती. ३४ चेंडूत ५२ धावा करून ती बाद झाली. हरमनने आपल्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. सध्या दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष क्रीजवर आहेत.

IND W vs AUS W T20 Live Score : जेमिमा बाद

११व्या षटकात भारताला चौथा धक्का बसला. जेमिमा रॉड्रिग्स डार्सी ब्राउनच्या गोलंदाजीवर विकेटकीपर हिलीच्या हातात झेलबाद झाली. तिने २४ चेंडूत ४३ धावा केल्या. जेमीने ६ चौकार मारले. आता हरमनप्रीत-रिचा क्रीजवर आहेत. भारताला ५४ चेंडूत ७३ धावांची आवश्यकता आहे.

IND W vs AUS W T20 Live Score : जेमिमा-हरमनप्रीतची शानदार फलंदाजी

भारताच्या १० षटकात ९३ धावा झाल्या आहेत. जेमिमा-हरमनप्रीत यांच्यात ५० हून अधिक धावांची भागिदारी झाली आहे. भारताला आता विजयासाठी ६० चेंडूत ८० धावांची आवश्यकता आहे. जेमिमा ३९ तर हरमनप्रीत ३१ धावांवर खेळत आहे.

IND W vs AUS W T20 Live Score : भारताला ११४ धावांची गरज 

भारतीय संघाने सहा षटकांत तीन गडी गमावून ५९ धावा केल्या आहेत. सध्या जेमिमा रॉड्रिग्ज १० चेंडूत २० धावा आणि हरमनप्रीत कौर ९ चेंडूत १८ धावांवर खेळत आहेत. भारताला ८४ चेंडूत ११४ धावांची गरज आहे.

IND W vs AUS W T20 Live Score : भारताला तिसरा धक्का

चौथ्या षटकात भारताला तिसरा धक्का बसला. यास्तिका भाटिया आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यातील गोंधळात यास्तिका धावबाद झाली. यास्तिकाला ७ चेंडूत ४ धावा करता आल्या. ४ षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन बाद ३३ झाली आहे. सध्या कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स क्रीजवर आहेत.

IND W vs AUS W T20 Live Score : स्मृती मानधना बाद

तिसऱ्या षटकात स्मृती मानधना पायचीत झाली. तिला अॅश गार्डनरने बाद केले. स्मृतीने ५ चेंडूत २ धावा केल्या. आता जेमीमा रॉड्रिग्स फलंदाजीस आली आहे.

IND W vs AUS W T20 Live Score : शेफाली बाद

१७३ धावांचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली. दुसऱ्याच षटकात शेफाली वर्मा पायचीत बाद झाली. तिने ६ चेंडूत एका चौकाराच्या साह्याने ९ धावा केल्या. आता स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया खेळत आहेत. २ षटकांनंतर भारताच्या १५ धावा झाल्या आहेत.

IND W vs AUS W T20 Live Score : भारतासमोर १७३ धावांचे लक्ष्य 

केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १७३ धावांचे लक्ष्य दिले आहे. बेथ मुनीचे अर्धशतक आणि मेग लॅनिंगच्या तुफानी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या आहेत.

मुनीने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. तर लॅनिंगने ३४ चेंडूत ४९ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी ऍशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. भारताकडून शिखा पांडेने दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

IND W vs AUS W Live : ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

१८व्या षटकात ऑस्ट्रेलियन संघाला १४१ धावांवर तिसरा धक्का बसला. अॅश्ले गार्डनरला दीप्ती शर्माने क्लीन बोल्ड केले. १८ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३१ धावांची झंझावाती खेळी केल्यानंतर ऍशले बाद झाली. तिने मेग लॅनिंगसोबत ३६ चेंडूत ५३ धावांची भागीदारी केली. सध्या ग्रेस हॅरिस आणि मेग लॅनिंग क्रीजवर आहेत. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १८ षटकांत ३ बाद १४२ अशी आहे.

IND W vs AUS W T20 Live Score : ऑस्ट्रेलियाची वेगवान फलंदाजी

१६ षटकांत ऑस्ट्रेलियाच्या १२६ धावा झाल्या आहेत. अॅशले गार्डनर आणि मेग लॅनिंग वेगाने धावा करत आहेत. गार्डनर २८ तर लॅनिंग २४ धावांवर खेळत आहेत. 

IND W vs AUS W Live : ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

ऑस्ट्रेलियाला १२व्या षटकात ८८ धावांवर दुसरा धक्का बसला. दोन सोपे झेल सोडल्यानंतर अखेर भारतीय संघाला बेथ मुनीचा झेल पकडण्यात यश आले. शिखा पांडेच्या गोलंदाजीवर शेफाली वर्माने मुनीचा झेल पकडला. मुनीने ३७ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. 

IND W vs AUS W T20 Live Score : १० षटकात ६९ धावा

१० षटकांनंतर ऑस्ट्रेलियाच्या १ बाद ६९ धावा झाल्या आहेत. भारतीय संघाच्या खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला आहे. संघाने २ षटकात २ महत्वपूर्ण झेल सोडले आहेत. सध्या कर्णधार मेग लॅनिंग आणि बेथ मूनी क्रीजवर आहेत.

नवव्या षटकात स्नेह राणाच्या चेंडूवर यष्टीरक्षक रिचा घोषने मेग लॅनिंगचा झेल सोडला. यानंतर १०व्या षटकात शेफालीने राधा यादवच्या चेंडूवर बेथ मुनीचा सोपा झेल सोडला. यानंतर हा चौकार गेला. सध्या मुनी २८ चेंडूत ३७ धावा आणि लॅनिंगने सात चेंडूत पाच धावा केल्यानंतर क्रीजवर आहे.

IND W vs AUS W T20 Live Score : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

सातव्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या नादात अलिसा हीली यष्टीचीत झाली. फिरकी गोलंदाज राधा यादवने भारताला पहिला विकेट मिळवून दिला. सध्या ऑस्ट्रेलियाच्या ७ षटकांनंतर १ बाद ५४ धावा झाल्या आहेत. बेथ मूनी आणि कर्णधार मेग लॅनिंग क्रीझवर आहेत. 

IND W vs AUS W T20 Live Score : पॉवर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ४३ धावा

पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने ६ षटकात एकही विकेट न गमावत ४३ धावा केल्या आहेत. अलिसा हीली आणि बेथ मुनी क्रीजवर आहेत. हीली २४ तर बेथ मूनी १६ धावांवर खेळत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाच्या ६.४ षटकात ४६ धावा झाल्या आहेत.

IND W vs AUS W T20 Live Score : ऑस्ट्रेलिया तीन षटकांनंतर २१/0

तीन षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता २१ धावा केल्या आहेत. अॅलिसा हीली सध्या १२ चेंडूत १४ धावांवर आणि बेथ मुनी सहा चेंडूत ७ धावांवर खेळत आहे. 

IND W vs AUS W T20 Live Score : ऑस्ट्रेलियाची शानदार सुरुवात

अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मुनी ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आल्या. हीलीने डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. रेणुकाने पहिल्याच षटकात सहा धावा दिल्या.

IND W vs AUS W Live: दोन्ही संघ खालीलप्रमाणे आहेत

भारत

शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग.

ऑस्ट्रेलिया

अॅलिसा हिली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅशले गार्डनर, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शुट, डी'आर्सी ब्राउन.

IND W vs AUS W Live: ऑस्ट्रेलियाची फलंदाजी 

ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. त्याचवेळी कर्णधार हरमनप्रीत कौर हा सामना खेळत आहे ही भारतीय संघासाठी दिलासादायक बाब आहे. सामन्यापूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले जात होते की ती आजारी आहे. 

नाणेफेकीदरम्यान तिने असेही सांगितले की ती आजारी होती, पण आता ती बरी आहे. त्याचबरोबर भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. आजारी पूजा वस्त्राकरच्या जागी स्नेह राणाला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर देविका वैद्यच्या जागी यस्तिका भाटिया आणि राजेश्वरी गायकवाडच्या जागी राधा यादवचा प्लेईंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

IND W vs AUS W Live :  गोलंदाजीत केवळ रेणुकाने छाप पाडली 

गोलंदाजीत रेणुका सिंग ही एकमेव गोलंदाज आहे, जिने आतापर्यंत स्पर्धेत प्रभाव पाडला आहे. रेणुकाने स्पर्धेत ७ बळी घेतले आहेत. राधा यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांना वेगळी कामगिरी करावी लागणार आहे. तर दीप्ती शर्माला पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका साकारावी लागणार आहे. 

IND W vs AUS W Live: पूजा वस्त्राकर संघाबाहेर, हरमनप्रीतबाबत लवकरच निर्णय होणार

महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर आजारी पडली असून पूजा वस्त्राकर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडली आहे. दुसरीकडे, हरमनप्रीत कौरचेही या सामन्यात खेळणे कठीण आहे.

पूजा वस्त्राकरला श्वास घेण्यास त्रास होत आहे. तिला घशाचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर कॅप्टन हरमनप्रीत अद्याप तापातून सावरलेली नाही. हरमनप्रीत या सामन्यात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या वैद्यकीय पथक सर्व खेळाडूंची काळजी घेत आहे.

IND W vs AUS W Live : महिला T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा दबदबा

आतापर्यंत ७ महिला टी-20 वर्ल्डकप झाले आहेत. यांपैकी ६ वेळा ऑस्ट्रेलियन संघ फायनलमध्ये पोहोचला आहे आणि ५ वेळा विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाला आज २०२० च्या T20 विश्वचषक फायनलमधील पराभवाचा आणि कॉमनवेल्थ गेम्स २०२२ फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

IND W vs AUS W Live : ऑस्ट्रेलियन संघ गेल्या २२ सामन्यांपासून अपराजित

२०२० मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 विश्वचषकाचा शेवटचा अंतिम सामना खेळला गेला होता. परंतु यावेळी हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या २२ सामन्यांपासून अपराजित आहे. सोबतच, सामन्याच्या काही तास आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर संघाबाहेर झाली आहे. तिच्या घशात संसर्ग झाला आहे.

WhatsApp channel