मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI : पहिल्या टी-20 मध्ये भारताचा मोठा विजय, मालिकेत १-० अशी आघाडी

IND vs WI : पहिल्या टी-20 मध्ये भारताचा मोठा विजय, मालिकेत १-० अशी आघाडी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 29, 2022 11:58 PM IST

पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा १ ऑगस्ट रोजी सामना सेंट किट्स येथे होणार आहे.

IND vs WI
IND vs WI

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना भारताने ६८ धाावांनी जिंकला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ २० षटकात ८ बाद १२२ धावाच करु शकला.

या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा १ ऑगस्ट रोजी सामना सेंट किट्स येथे होणार आहे.

दरम्यान, १९१ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज २० धावांच्या पुढे जावू शकला नाही. त्यांचा सलामीवीर शेमराह ब्रुक्स यानेच सर्वाधिक २० धावा केल्या. तर भारताकडून अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी शानदार गोलंदाजी केली. तिघांनीही प्रत्येकी २ गडी बाद केले.

भारताचा डाव-

दरम्यान, भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १९० धावा केल्या होत्या. भारताकडून सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६४ धावा केल्या. रोहितने त्याच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार ठोकले.

भारताची मधली फळी आजच्या सामन्यात अपयशी ठरली. श्रेयस अय्यर,हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत स्वस्तात तंबूत परतले. मात्र, त्यानंतर फिनीशर दिनेश कार्तिकने शेवटच्या काही षटकात जोरदार फटकेबाजी केली. कार्तिकने ४१ धावा चोपल्या. त्याने अवघ्या १९ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार आणि २ षटकार खेचले.या फटकेबाजीच्या जोरावरच भारताने १९० धावांपर्यंत मजल मारली. तर वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने सर्वाधिक २ गडी बाद केले.

WhatsApp channel