मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SL T20 : उमरान मलिकची कमाल, बुमराहलाही मागे टाकलं! किती वेगात चेंडू टाकला माहित्येय?

IND vs SL T20 : उमरान मलिकची कमाल, बुमराहलाही मागे टाकलं! किती वेगात चेंडू टाकला माहित्येय?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 04, 2023 05:27 PM IST

Umran Malik Record News in Marathi : भारत विरुद्ध श्रीलंकेतील पहिल्याच टी-ट्वेंटी सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिक यानं नवा विक्रम केला आहे.

Umran Malik
Umran Malik

Umran Malik Record in IND vs SL T20 : भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना मंगळवारी भारतानं जिंकला. या सामन्यातून टी-ट्वेंटीमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम मावी यानं चार षटकांत अवघ्या २२ धावा देऊन ४ बळी घेतले. मात्र, सध्या चर्चा आहे ती वेगवान गोलंदाज उमरान मलिक याची.

भारताची लांब पल्ल्याची तोफ असलेल्या उमरान मलिक यानं कालच्या सामन्यात पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. अचूक टप्प्यावर मारा करत चार षटकांत २७ धावा देऊन त्यानं दोन गडी बाद केले. या उत्तम कामगिरीबरोबरच मलिकनं या सामन्यात आणखी एक विक्रम केला. उमराननं कालच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका याला बाद केलं. शनाकानं २७ चेंडूंमध्ये ४५ धावा कुटल्या होत्या. तो खेळपट्टीवर राहिला असता तर सामना हातातून गेला असता. मात्र, उमराननं ऐन वेळी त्याला टिपलं. ही विकेट भारतासाठी सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरली. उमरानचा हा चेंडू सामना फिरवणारा ठरलाच, पण भारताकडून ‘विक्रमी’ देखील ठरला.   

उमराननं ज्या चेंडूवर शनाकाला बाद केलं, त्या चेंडूचा वेग ताशी १५५ किमी होता. हा सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू होता. इतकंच नव्हे, तर उमराननं भारताकडून वेगवान चेंडू टाकण्याचा जसप्रीत बुमराहचा विक्रमही मोडला. बुमराहच्या नावावर १५३.३६ किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकण्याचा विक्रम होता. उमराननं आपल्या वेगवान गोलंदाजीनं आधीच प्रभावित केलं आहे, आता त्याची गोलंदाजी अचूक टप्प्यावरही पडत आहे. टीम इंडियासाठी ही आश्वासक गोष्ट असल्याचं मानलं जातं.

कसा झाला पहिला टी-ट्वेंटी सामना

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कालच्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. भारतानं २० षटकांत ५ गडी बाद १६५ धावा केल्या. भारताकडून दीपक हुड्डा यानं २३ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी खेळली. तर, अक्षर पटेलनं २० चेंडूत नाबाद ३१ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २० षटकांत १६० धावांवर गारद झाला.

WhatsApp channel