मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs SA 1st ODI: संजू एकटाच लढला, पहिल्या वनडेत भारताचा ९ धावांनी पराभव

Ind vs SA 1st ODI: संजू एकटाच लढला, पहिल्या वनडेत भारताचा ९ धावांनी पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 06, 2022 10:50 PM IST

Ind vs SA 1st ODI Match: पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. ४० षटकांच्या सामन्यात २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. संजू सॅमसनने शेवटच्या षटकात खूप प्रयत्न केले, पण तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Ind vs SA 1st ODI Match
Ind vs SA 1st ODI Match

लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला आहे. पावसामुळे सामना ४० षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने ४० षटकांत ४ गडी गमावून २४९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात २४० धावांपर्यंतच मजल मारली. 

भारताकडून संजू सॅमसनने ६३ चेंडूत ८६ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने ९ चौकार आणि ३ षटकार खेचले. त्याचवेळी उपकर्णधार श्रेयस अय्यरने ५० धावा केल्या.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुढील एकदिवसीय सामना ९ ऑक्टोबर रोजी रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय संघ या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय मैदानात उतरला आहे. हे सर्वजण T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. संघाची कमान शिखर धवनच्या हाती आहे.

आफ्रिकेचा डाव

प्रथम फलंदाजीस आलेल्या आफ्रिकन संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि यानेमन मलान यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर कर्णधार टेम्बा बवूमा आणि एडन मार्करम स्वस्तात बाद झाले. बवुमाला शार्दुल ठाकूरने ८ धावांवर क्लीन बोल्ड केले. तर मार्करमला चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या जाळ्यात अडकवले. मार्करम शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.

त्यानंतर क्विंटन डी कॉक हा देखील ५४ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. डीकॉक बाद झाल्यानंतर मात्र, हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. डेव्हिड मिलर ६३ चेंडूत ७५ आणि हेनरिक क्लासेन ६५ चेंडूत ७४ धावा करून नाबाद राहिले. दोघांमध्ये १०६ चेंडूत १३९ धावांची भागीदारी झाली. या भागिदारीच्या जोरावरच आफ्रिकेने २४९ धावसंख्येपर्यंत मजल मारली.  तर भारताकडून शार्दुल ठाकूरने ३५ धावांत सर्वाधिक २ बळी घेतले,

WhatsApp channel