मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs PAK ODI WC : वर्ल्डकपमध्ये या मैदानावर रंगणार भारत-पाक थरार, तर चेन्नईत ऑस्ट्रेलियाला भिडणार

IND vs PAK ODI WC : वर्ल्डकपमध्ये या मैदानावर रंगणार भारत-पाक थरार, तर चेन्नईत ऑस्ट्रेलियाला भिडणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 04, 2023 06:56 PM IST

IND Vs PAK odi world cup 2023 : आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करेल. जर सर्व काही वेळापत्रकानुसार झाले तर ५ ऑक्टोबरपासून ५० षटकांचा विश्वचषक सुरू होईल.

IND Vs PAK odi world cup 2023
IND Vs PAK odi world cup 2023

India vs Pakistan, World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस भारतात खेळवला जाणार आहे. याची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या विश्वचषकाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याच्या ठिकाणाची माहिती (ind vs paks odi World Cup Venue) समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो.

भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादमध्ये

हा सामना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने येतील. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हा सामना अहमदाबादमध्ये ठेवण्याच्या विचारात आहे. येथे १ लाख प्रेक्षक आरामात सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

वृत्तानुसार, आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआय आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर करेल. जर सर्व काही वेळापत्रकानुसार झाले तर ५ ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक सुरू होईल. यासाठी अनेक ठिकाणे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. या यादीत नागपूर, बेंगळुरू, त्रिवेंद्रम, मुंबई, दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, इंदूर, बंगळुरू आणि धर्मशाला यांचा समावेश आहे.

त्याचवेळी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचे सर्व सामने चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता येथे खेळवले जाऊ शकतात. मात्र, यापैकी फक्त सात स्थळांवर भारताचे साखळी सामने होणार आहेत.

पाकिस्तानचे बहुतांश सामने चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये होतील

रिपोर्टनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये आपले बहुतांश सामने खेळू शकतो. कोलकाताचे ईडन गार्डनही विचारात घेतले जावू शकते. त्याचप्रमाणे, बांगलादेश देखील आपले बहुतेक सामने कोलकाता आणि गुवाहाटी येथे खेळू शकतो कारण यामुळे शेजारील देशाच्या चाहत्यांसाठी प्रवासाचे अंतर कमी होईल.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पावसाळ्याच्या हंगामामुळे, बीसीसीआयने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापूर्वी देशाच्या दक्षिण भागातील सामने पूर्ण करण्याचा विचार केला आहे.

भारताचे सामने फिरकीला अनुकूल मैदानांवर होतील

सोबतच, अशीही माहिती समोर आली आहे, बीसीसीआयने भारतीय संघ व्यवस्थापनाशी देखील सल्लामसलत केली आहे आणि पाकिस्तानव्यतिरिक्त इतर सामन्यांसाठी त्यांची पसंती जाणून घेतली. यानंतर टीम इंडियाने ज्या मैदानांवर फिरकीला मदत मिळते, अशा मैदानांवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धचे सामने ठेवण्याची विनंती केली आहे.

यामुळे चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया सामना होण्याची दाट शक्यता आहे, तर न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामनेदेखील संथ खेळपट्ट्या असलेल्या मैदानांवर खेळवले जातील. बीसीसीआयने वनडे विश्वचषकापूर्वी देशभरातील स्टेडियम अपग्रेड करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

WhatsApp channel