मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ T20 Highlights : पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाचा पराभव, न्यूझीलंडने २१ धावांनी सामना जिंकला

IND vs NZ T20 Highlights : पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाचा पराभव, न्यूझीलंडने २१ धावांनी सामना जिंकला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2023 04:23 PM IST

India vs New zeland T20 (IND vs NZ T20) Highlights : न्यूझीलंडने पहिल्या T20 सामन्यात भारताचा २१ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

IND vs NZ T20 Live Score Update
IND vs NZ T20 Live Score Update

new zeland beat india : पहिल्या T20 मध्ये न्यूझीलंडने भारतावर २१ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ २० षटकात ९ बाद १५५ धावाच करू शकला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याने २८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवने ४७ धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून ब्रेसवेल, फर्ग्युसन आणि सँटनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच, जेकब डफी आणि इश सोढी यांना एक विकेट मिळाली..

 या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यांच्याकडून डेव्हन कॉनवेने ५२ आणि डॅरिल मिशेलने नाबाद ५९ धावा केल्या होत्या.

या सामन्यात सूर्यकुमार आणि सुंदर यांच्याशिवाय भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली. सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्याचवेळी भारतीय गोलंदाजांची कामगिरीही निराशाजनक ठरली. अर्शदीपने चार षटकांत ५१ धावा दिल्या. उमरानने एका षटकात १६ धावा, मावीने दोन षटकांत १९ धावा आणि हार्दिकने ३ षटकांत ३३ धावा दिल्या.

हार्दिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा दुसरा पराभव आहे. यापूर्वी श्रीलंकेकडून भारताचा पराभूत झाला होता. त्याचवेळी, भारतीय संघाला जवळपास १५ महिन्यांनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यापूर्वी, ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भारताला या फॉरमॅटमध्ये किवी संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

IND vs NZ Live: भारताला पाचवा धक्का, सुर्या-हार्दिक बाद

सलग दोन षटकांत भारताला दोन धक्के बसले आहेत. सूर्यकुमार १२व्या षटकात बाद झाला. तर १३व्या षटकात कर्णधार हार्दिक पंड्याही खराब शॉट खेळून बाद झाला. त्याला २० चेंडूत २१ धावा करता आल्या. हार्दिकचा झेल ब्रेसवेलने त्याच्याच चेंडूवर टिपला. तर सूर्याने ३४ चेंडूत ४७ धावांची खेळी खेळली. सूर्यकुमारने आपल्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार मारले. भारताची धावसंख्या १३ षटकांनंतर ५ बाद ९० अशी आहे. भारताला ४२ चेंडूत ८७ धावांची गरज आहे. सध्या वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडा क्रीजवर आहेत.

IND vs NZ Live: भारताला तिसरा धक्का

१५ धावांवर भारताचा तिसरा विकेट पडला. सलामीवीर शुभमन गिल ७ धावा करून बाद झाला. त्याला मिचेल सँटनरने झेलबाद केले. सध्या हार्दिक पंड्या आणि सुर्यकुमार यादव मैदानात आहेत.

IND vs NZ Live: भारताला दुसरा धक्का

११ धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. वन डाउनला आलेला राहुल त्रपाठी शुन्यावर बाद झाला. त्याला जेकब डफीने विकेटकीपर कॉनवेकडे झेलबाद केले.  

IND vs NZ Live: भारताला पहिला धक्का, इशान किशन बाद

१७७ धावांचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली. दुसऱ्याच षटकात सलामीवीर इशान किशन ४ धावा करून बाद झाला. त्याला फिरकीपटू मायकेल ब्रेसवेलने क्लीन बोल्ड केले. भारताच्या २ षटकात ११ धावा झाल्या आहेत.

 IND vs NZ Live: भारतासमोर १७७ धावांचे लक्ष्य

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी वेगवान सुरुवात केली. फिन एलन-कॉनवने जोडीने अवघ्या ४ षटकात ४३ धावा फटकावल्या होत्या. मात्र, पाचव्या षटकात खेळ बदलला. हे षटक फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने टाकले. सुंदरने या षटकात दोन फलंदाज तंबूत पाठवले. त्याने आधी एलनला बाद केले. त्यानंतर आलेल्या मार्क चॅपमनला शुन्यावर बाद केले. एलनने २३ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि एक षटकार ठोकला.

त्यानंतर आलेला ग्लेन फिलिप्सने कॉनवेला चांगली साथ दिली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी केली. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या नादात फिलिप्स झेलबाद झाला. त्याने कुलदीपच्या गोलंदाजीवर सुर्याकडे झेल दिला. त्यानंतर कॉनवेने एक बाजू लावून धरत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३५ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याने ७ चौकार १ षटकार लगावला. त्याला डॅरिल मिचेलने सुंदर साथ दिली.

न्यूझीलंडचा संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता. मात्र, तेवढ्यात पुन्हा त्यांच्या एकाच षटकात दोन विकेट गेल्या. सेट झालेला कॉनवे १८ व्या षटकात बाद झाला. त्यानंतर धोकादायक मायकल ब्रेसवेलदेखील याच षटकात शुन्यावर धावबाद झाला.

शेवटी डॅरिल मिचेलने थोडीफार फटकेबाजी केली. त्याने ३० चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांच्या साह्याने ५९ धावा चोपल्या.

तर भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २२ धावांत सर्वाधिक २ बळी घेतले. तसेच, अर्शदीप, मावी आणि कुलदीप यांना प्रत्येकी १ विकेट मिळला.

IND vs NZ Live: २०व्या अर्शदीपने दिल्या षटकात २७ धावा

या सामन्यात अर्शदीप सिंगने खराब गोलंदाजी केली. त्याने चार षटकात ५१ धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली. अर्शदीप २०व्या षटकात २७ धावा दिल्या. अर्शदीपच्या षटकात डॅरिल मिचेलने सलग ३ षटकार ठोकले आणि १ चौकार लगावला. अर्शदीपने या षटकात एक नो बॉलही टाकला.

अर्शदीपचे शेवटचे षटक- नो बॉल+६, ६, ६, ४, ०, २, २

IND vs NZ Live: ब्रेसवेल धावबाद

१८व्या षटकात किवी संघाला पाचवा धक्का बसला. इशान किशनने मायकेल ब्रेसवेलला विकेटच्या मागे धावबाद केले. न्यूझीलंडची धावसंख्या १८ षटकांत ५ बाद १४१ अशी आहे. सध्या कर्णधार मिचेल सँटनर आणि डॅरिल मिशेल क्रीजवर आहेत.

8:25: IND vs NZ Live: न्यूझीलंडला चौथा धक्का

१८व्या षटकात १३९ धावांवर न्यूझीलंडला चौथा धक्का बसला. अर्शदीप सिंगने डेव्हॉन कॉनवेला दीपक हुडाकडून झेलबाद केले. कॉनवे ३५ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. कॉनवेने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार लगावला.

8:01: IND vs NZ 1st T20 Live score: न्यूझीलंडला तिसरा धक्का

न्यूझीलंडला १३व्या षटकात १०३ धावांवर तिसरा धक्का बसला. कुलदीप यादवने ग्लेन फिलिप्सला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. फिलिप्सने डेव्हन कॉनवेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ६० धावांची भागीदारी केली. फिलिप्स २२ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. सध्या डॅरिल मिशेल एक धाव आणि कॉनवे २८ चेंडूत ४७ धावा करून क्रीजवर आहे. १३ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद १०४ आहे.

7:35: IND vs NZ 1st T20 Live score पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडच्या २ बाद ४७ धावा

पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडच्या २ बाद ४७ धावा केल्या आहेत. पाचव्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने फिन एलन आणि मार्क चॅपमन यांना बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडच्या धावगतीला ब्रेक लागला आहे. चॅपमन शुन्यावर तर एलन २३ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. आता फिलिप्स आणि कॉनवे मैदानात आहेत.

7:25: IND vs NZ 1st T20 Live score: न्यूझीलंडची वेगवान सुरुवात

फिन अॅलन आणि डेव्हन कॉनवे यांनी न्यूझीलंडला दमदार सुरुवात करून दिली. दोन षटकांनंतर किवी संघाची धावसंख्या एकही विकेट न गमावता २३ धावा आहे. सध्या अॅलन १६ आणि कॉनवे ४ धावा करत क्रीजवर आहे. हार्दिकने पहिल्या षटकात १२ धावा आणि अर्शदीपने दुसऱ्या षटकात ११ धावा दिल्या.

7:08: IND vs NZ 1st T20 Live score: सामना सुरू, पहिल्याच षटकात १२ धावा

न्यूझीलंडचे सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि फिन अॅलन फलंदाजीला आले. त्याचवेळी कर्णधार हार्दिक पंड्याने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली. ऍलनने पहिल्याच षटकात २ चौकार मारले. एका षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या एकही विकेट न गमावता १२ धावा आहे.

6:38: दोन्ही प्लेइंग ११

न्यूझीलंड-

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

भारत-

शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव।

6:35: IND vs NZ Live: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हार्दिकने प्लेइंग-११ मध्ये पृथ्वी शॉ, युझवेंद्र चहल, जितेश शर्मा आणि मुकेश कुमार यांना संधी दिली नाही. त्याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनेही प्लेइंग-११ मध्ये बदल केला आहे.

5:35: IND vs NZ 1st T20 Live: पीच रिपोर्ट

रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे भारतातील इतर मैदानांपेक्षा थोडे वेगळे आहे. हे एक मोठे मैदान आहे जिथे फिरकीपटूंच्या यशाचा इतिहास आहे. रांचीच्या पीचवर संथ आणि फिरकी गोलंदाजांना अधिक फायदा मिळतो. यापूर्वी रांचीमध्ये ३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. रांचीमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो.

4:45: रांचीचे हवामान कसं असेल?

भारत आणि न्यूझीलंड टी-20 सामन्याच्या दिवशी रांचीचे हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. शुक्रवारी येथे दिवसाचे तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी त्यात घट होऊन तापमानाचा पारा १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. रांचीमध्ये दिवसभर आणि सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. असे हवामान खात्याने म्हटले आहे.

4:05: पृथ्वी शॉ प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणार

टीममध्ये पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉपेक्षा फॉर्मात असलेल्या शुभमन गिलला प्राधान्य दिले जाईल, असे भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने गुरुवारी सांगितले. गिलचा वनडेतील उत्कृष्ट फॉर्म पाहता त्याची निवड निश्चित असल्याचे हार्दिकने सांगितले. त्यामुळे पृथ्वी शॉला आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत:

शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, इश सोढी, ब्लेअर टिकनर, बेन लिस्टर/जेकब डफी.

 

WhatsApp channel