मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind Vs NZ T20I : टीम इंडियाला झटका.. सलामीवीर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संघाबाहेर; BCCI नाराज

Ind Vs NZ T20I : टीम इंडियाला झटका.. सलामीवीर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संघाबाहेर; BCCI नाराज

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 26, 2023 06:56 PM IST

Ruturaj Gaikwad ruled out : भारत व न्यूझीलंड दरम्यान शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतून युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे.

ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाड

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.  संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे शुक्रवारपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. गायकवाडला चालू रणजी ट्रॉफी हंगामात मनगटाची दुखापत झाली होती, त्यानंतर तो पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला होता.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, गायकवाड मनगटाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.  ऋतुराजच्या वारंवार दुखापतींमुळे बीसीसीआय थिंक टँक त्याच्यावर नाराज आहे. हा युवा सलामीवीर दुखापतीमुळे गेल्या अनेक मालिकांमधून बाहेर पडला आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला होता. दुखापतीमुळे तो आयर्लंड दौऱ्यावर पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही आणि दुसऱ्या सामन्यात तो बाहेर पडला. 

टीम इंडियात ऋतुराज अजूनही आपली जागा शोधण्यासाठी धडपडत आहे. तो संघाचा नियमित सदस्य नाही. वरिष्ठांच्या अनुपस्थितीत त्याला संधी मिळते. मात्र दुखापतीमुळे त्याला संधीचे सोने करता येत नाही. त्याच्या संघाबाहेर जाण्यामुळे पृथ्वी शॉला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. शॉ बराच काळ संघाबाहेर होता आणि आता त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळाली आहे. जुलै २०२१ मध्ये पदार्पण केल्यापासून ऋतुराजने एक वनडे आणि  ९ टी-२०  सामने खेळले आहेत. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२७ जानेवारी) रांची येथे खेळवला जाणार आहे. दुसरा सामना रविवारी (२९ जानेवारी) लखनऊमध्ये होईल, तर तिसरा टी-२० सामना १ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.

WhatsApp channel