
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यातले ट्वीटयुद्ध हे काही नवीन नाही. टी-20 विश्वचषकाचा दुसऱ्या सेमी फायनलचा सामना आज (१० नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. या दरम्यान, ट्विटरवर वॉन आणि जाफर पुन्हा आमने सामने आले.
सेमी फानयल सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. मार्क वुड दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही. अशा स्थितीत वॉनने एक ट्वीट केले आहे. यात त्याने भारत फेव्हरेट असल्याचे लिहिले आहे.
ट्वीटरवर नेमकं काय घडलं
वॉनने ट्विटरवर लिहिले की, 'इंग्लंडला मोठा धक्का... वुड फिट नाही. भारत आता फेव्हरेट आहे….’ यावर जाफरने क्षणाचाही विलंब न करता कमेंट करत लिहिले, ‘हॅलो ऋषी सुनक! पुढील काही तासांसाठी यॉर्कशायरमध्ये मोबाईल सिग्नल जॅमर बसवले जावेत, मला वाटते भारताकडून या गोष्टीला गुडविल जेस्चर म्हणून पाहिले जाईल". धन्यवाद.'
दरम्यान, सेमी फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात मार्क वुड आणि डेव्हिड मलान दुखापतींमुळे बाहेर आहेत. या दोघांच्या जागी ख्रिस जॉर्डन आणि फिलिप सॉल्टची निवड करण्यात आली आहे. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आजच्या सामन्यातील विजेता संघ १३ नोव्हेंबरला जेकेपदासाठी पाकिस्तानशी लढेल. पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवून फायनल गाठली आहे.
संबंधित बातम्या
