मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Joe Root: टेस्ट क्रिकेटचा नवा किंग! १९ महिन्यात ११ शतके, रुटची जबरदस्त कामगिरी

Joe Root: टेस्ट क्रिकेटचा नवा किंग! १९ महिन्यात ११ शतके, रुटची जबरदस्त कामगिरी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 05, 2022 06:01 PM IST

जो रुटने कारकिर्दीतील २८ वे कसोटी शतक झळकावले आहे. कसोटीत शतके ठोकण्याच्या बाबतीत तो फॅब-४ खेळाडूंमध्ये आघाडीवर आहे. तर स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.

joe root
joe root

एजबॅस्टन कसोटीत जो रूटने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, की तोच कसोटी क्रिकेटचा नवा किंग आहे. या सामन्यात त्याचा सामना विराट कोहलीशी झाला, जो फॅब-४ (जगातील चार अव्वल फलंदाज) मध्ये समाविष्ट आहे. कोहली या कसोटीत फॉर्मात असलेल्या रूटला कडवी झुंज देईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. विराटला दोन्ही डावात मिळून केवळ ३१ धावा करता आल्या. त्याचवेळी रुटने दुसऱ्या डावात शतक झळकावत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

रूटने या निर्णायक सामन्यात आपल्या कारकिर्दीतील २८ वे कसोटी शतक झळकावले. कसोटीत शतके ठोकण्याच्या बाबतीत तो फॅब-४ खेळाडूंमध्ये आघाडीवर आहे. यामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांच्या नावावर २७-२७ शतके आहेत. विराटने बांगलादेशविरुद्ध २२ नोव्हेंबर २०१९ रोजी शेवटचे शतक झळकावले होते. त्याचवेळी स्मिथने भारताविरुद्ध ७ जानेवारी २०२१ रोजी शेवटचे शतक झळकावले आहे. केन विल्यमसनचे शेवटचे शतक ३ जानेवारी २०२१ रोजी पाकिस्तानविरुद्ध आले होते. त्याच्या नावावर कसोटीत २४ शतके आहेत.

गेल्या १९ महिन्यांपासून जो रुट करिअरमधील सर्वोत्तम फॉर्ममध्ये 

गेल्या १९ महिन्यांमध्ये रूटने कसोटीत तब्बल ११ शतके झळकावली आहेत. या बाबतीत तो कोहली, स्मिथ आणि विल्यमसनपेक्षा खूप पुढे निघून गेला आहे. २०२१ च्या सुरुवातीला विराटची २७, स्टीव्ह स्मिथची २६, विल्यमसनची २४ तर जो रूटच्या नावावर १७ शतके होती. यादरम्यान रुटने ११ तर स्मिथ आणि विल्यमसनने प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. तर कोहली शतकांच्या बाबतीत पिछाडीवर राहिला. त्याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाही.

फॅब फोरमध्ये जो रुट सर्वांच्या पुढे-

कोहली, स्मिथ, विल्यमसन आणि रूट यांच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली, तर रुट आघाडीवर असल्याचे पाहायला मिळेत. तो या तिन्ही दिग्गजांपेक्षा जास्त कसोटी खेळला आहे. रुटने १२१ सामन्यांमध्ये १० हजार ४५८ धावा आहेत. त्याचबरोबर कोहलीने १०२ सामन्यांमध्ये 8074 धावा केल्या आहेत, स्मिथने ८६ सामन्यांमध्ये ८०१६ धावा केल्या आहेत तर विल्यमसनने ८८ कसोटी सामन्यात ७३६८ धावा केल्या आहेत.

हाशिम आमला आणि मायकल क्लार्कला मागे सोडले-

जो रुटने दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हाशिम आमला आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यांना सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे माजी कर्णधार अॅलिस्टर कूक आहे. कुकने १६१ कसोटीत ३३ शतके झळकावली होती. सचिन तेंडुलकर हा सर्वात जास्त ५१ कसोटी शतके झळकावणारा फलंदाज आहे.

भारताविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज जो रुट-

रुट हा भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत ९ शतके ठोकली आहेत. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग, स्टीव्ह स्मिथ, वेस्ट इंडिजचे व्हिव्ह रिचर्ड्स आणि गॅरी सोबर्स यांना मागे टाकले आहे, या सर्वांनी भारताविरुद्ध प्रत्येकी ८ शतके ठोकली आहेत.

एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज जो रुट-

तसेच, भारताविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके झळकावणारा रूट हा चौथा फलंदाज ठरला आहे. रुटने या मालिकेत भारताविरुद्ध ४ शतके ठोकली आहे. त्याच्यापूर्वी १९४७ मध्ये ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन, १९४८ मध्ये वेस्ट इंडिजचे एव्हर्टन वीक्स, १९८२ मध्ये मुदस्सर नाझर आणि २०१४ मध्ये स्टीव्ह स्मिथ यांनी भारताविरुद्ध एकाच मालिकेत प्रत्येकी ४ शतके झळकावली होती.

WhatsApp channel