मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Aus Hockey: हॉकीत भारताला रौप्य, फायनलमध्ये ७-० ने लाजिरवाणा पराभव

Ind vs Aus Hockey: हॉकीत भारताला रौप्य, फायनलमध्ये ७-० ने लाजिरवाणा पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 08, 2022 06:42 PM IST

भारतीय संघ तिसर्‍यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. २०१० आणि २०१४ च्या फायनलमध्येही टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. भारतीय संघाला बदला घेण्याची संधी होती, पण भारतीय संघ तसे करु शकला नाही.

Ind vs Aus Hockey
Ind vs Aus Hockey

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७-० असा पराभूत झाला. भारताला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण संघाने लाजिरवाणी कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. 

ऑस्ट्रेलिया सलग सातव्यांदा चॅम्पियन बनला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रत्येक वेळी पुरुष हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे. भारताला २०१० आणि २०१४ मध्ये रौप्य पदकही मिळाले होते. त्यावेळीही फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानेच भारताचा अनुक्रमे ८-० आणि ४-० असा पराभव केला होता.

पहिल्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाचे दोन

पहिल्या क्वार्टरच्या नवव्या मिनिटाला ब्लेक गोवर्सने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकने गोल केला. त्यानंतर १४व्या मिनिटाला नॅथन इफ्रॉम्सने मैदानी गोल करून ऑस्ट्रेलियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

कांगारूंचे दुसऱ्या क्वार्टरमध्ये तीन गोल 

दुसऱ्या क्वार्टरमध्येही ऑस्ट्रेलियाने आक्रमण सुरूच ठेवले. जेकब अँडरसनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत कांगारूंना ३-० अशी आघाडी मिळवून दिली. जेकबने २२व्या मिनिटाला गोल केला. त्याच्यानंतर टॉम विकहॅमने २६व्या मिनिटाला संघासाठी चौथा गोल केला. अँडरसनने २७व्या मिनिटाला आपला दुसरा आणि संघाचा पाचवा गोल केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी ५-० अशी झाली.

तिसरा क्वार्टर

तिसऱ्या क्वार्टरमध्येही ऑस्ट्रेलियाच्या संघाने आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्याच्यासाठी नॅथन इफ्रॉम्सने ४२ व्या मिनिटाला सहावा गोल केला. या सामन्यातील नॅथनचा हा दुसरा गोल आहे.

चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोल

चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने आणखी एक गोल केला. फ्लिन ओझिल्वीने ४६ व्या मिनिटाला गोल करत संघाला ७-० अशी आघाडी मिळवून दिली.

WhatsApp channel