मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND Vs AUS 3rd ODI : मालिका विजयासाठी भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य, हार्दिक-कुलदीपची शानदार गोलंदाजी

IND Vs AUS 3rd ODI : मालिका विजयासाठी भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य, हार्दिक-कुलदीपची शानदार गोलंदाजी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 22, 2023 05:42 PM IST

IND Vs AUS 3rd ODI 1st ininngs Scorecard : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २७० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND Vs AUS 3rd ODI 1st ininngs Scorecard
IND Vs AUS 3rd ODI 1st ininngs Scorecard

IND Vs AUS 3rd ODI 1st inning highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २७० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मोहम्मद सिराजने स्टार्कला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. स्टार्कने १० धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि ४९ षटकांत २६९ धावांवर आटोपला.

चेन्नईतील खेळपट्टी फलंदाजीसाठी फारशी सोपी नाही, त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करणे भारतासाठी फारसे सोपे नसेल. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाची शानदार सुरुवात

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची शानदार भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर हार्दिक पांड्याने हेडच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. हेडने ३३ धावा केल्या. यानंतर बॅटिंगला आलेला कांगारूंचा कर्णधार स्टीव्ह स्मिथही पॅव्हेलियनमध्ये परतला. स्मिथला हार्दिकने शुन्यावर बाद केले.

मधल्या फळीतील फलंदाजांनी विकेट्स फेकल्या

ऑस्ट्रेलिया या धक्क्यातून सावरणार तोच संघाला ८५ धावांवर तिसरा मोठा धक्का बसला. सलामीवीर मिचेल मार्श ४७ धावांची शानदार खेळी खेळल्यानंतर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इथून डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी पाहायला मिळाली. वॉर्नर आणि लबुशेन यांनी स्वताच्या चुकीने विकेट्स फेकल्या. कुलदीप यादवने दोघांना बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १३८ धावांत ५ बळी अशी केली.

तळाच्या फलंदाजांची शानदार कामगिरी

निम्मा संघ अवघ्या १३८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, ऑस्ट्रेलियन डाव मार्कस स्टॉइनिस आणि अॅलेक्स कॅरी यांनी सांभाळला. दोघांनी ६व्या विकेटसाठी ५४ चेंडूत ५८ धावांची भागीदारी करत धावसंख्या २०० च्या जवळ नेली. स्टॉइनिस २५ आणि कॅरी ३८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर सीन अॅबॉट आणि अॅश्टन एगर यांनी ८व्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी करत धावसंख्या २५० पर्यंत नेली.

शॉन अॅबॉटने २६, तर अॅश्टन अगरने १७ धावांची खेळी केली. मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पा यांनी शेवटच्या विकेटसाठी २२ धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या २६९ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

भारताकडून हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी गोलंदाजीत ३-३ तर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने २-२ बळी घेतले.

WhatsApp channel