मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS T20: रोहितच्या झंझावाती खेळीने भारत विजयी, मालिका १-१ अशी बरोबरीत
IND vs AUS
IND vs AUS

IND vs AUS T20: रोहितच्या झंझावाती खेळीने भारत विजयी, मालिका १-१ अशी बरोबरीत

23 September 2022, 23:05 ISTRohit Bibhishan Jetnavare

India Vs Australia T20i Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज नागपुरात खेळवला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोघांनी संघात प्रत्येकी दोन बदल केले होते. हा सामना पावसामुळे ८ षटकांचा खेळवला गेला.

भारताने दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह मालिकाही १-१ अशी बरोबरीत आली आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना आता २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा केल्या होत्या. 

प्रत्युत्तरात भारताने ७.२  षटकांत ४ गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. कर्णधार रोहित शर्माने २० चेंडूत ४६ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याचवेळी दिनेश कार्तिकने आठव्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून सामना संपवला. कार्तिक २ चेंडूत १० धावा करून नाबाद राहिला. 

पावसामुळे सामना ८ षटकांचा

पावसामुळे मैदान असल्याने टॉसला दोन तास ४५ मिनिटे उशीर झाला. त्यामुळे सामना प्रत्येकी ८ षटकांचा करण्यात आला. पॉवरप्ले दोन षटकांचा होता आणि गोलंदाजाला फक्त दोनच षटके टाकायची होती.

ऑस्ट्रेलियाचा डाव-

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच षटकात दोन धक्के बसले. अक्षर पटेलच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने कॅमरून ग्रीनचा झेल सोडला. मात्र, यानंतर षटकातील तिसऱ्या चेंडूवर याची भरपाई करताना विराटने ग्रीनला धावबाद केले. ग्रीन ४ चेंडूत ५ धावा काढून बाद झाला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलने ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही. दोन षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन बाद १९ धावा होती. त्यानंतर कर्णधार अॅरोन फिंचने थोडीफार फटकेबाजी केली.

मात्र, पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहने फिंचला क्लीन बोल्ड केले. फिंचने १५ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. फिंचने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यानंतर मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सुत्रे हातात घेतली. दोघांनी शेवटच्या तीन षटकात ४४ धावा कुटल्या. वेडने २० चेंडूत ४३ धावा ठोकल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले. वेडच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित ८ षटकात ९० धावांपर्यंत पोहचला. स्मिथने ५ चेंडूत ८ धावा केल्या. तर भारताकडून अक्षर पटेलने १३ धावांत २ गडी बाद केले.