shamai and siraj vs aus 1st odi : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (ind vs aus 1st odi) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाच गडी राखून विजय मिळवत मालिकेत धमाकेदार सुरुवात केली आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.
या दोन्ही गोलंदाजांनी सामन्यात प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. त्यामुळे पाहुण्या संघाला केवळ १८८ धावा करता आल्या. यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीत शानदार कामगिरी करत सामना जिंकून दिला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यातील विजयानंतर मोहम्मद शमी आणि सिराज यांची बीसीसीआय टीव्हीवर मुलाखत झाली. यादरम्यान दोघांनी एकमेकांना अनेक प्रश्न विचारले, ज्यामध्ये शमीने विकेट घेतल्यानंतर सिराजच्या सेलिब्रेशनबाबत एक वक्तव्य केले आहे.
खरं तर, मोहम्मद सिराज विकेट घेतल्यानंतर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोप्रमाणे हवेत उडी मारून सेलिब्रेशन करतो. यावर शमीने सिराजला प्रश्न केला की तो असे का करतो? यावर सिराज म्हणाला, 'मी रोनाल्डोचा चाहता आहे. म्हणूनच मी विकेट घेतल्यानंतर त्याच्याप्रमाणे सेलिब्रेट करतो. मात्र, मी असे सेलिब्रेशन फक्त फलंदाज जेव्हा क्लीन बोल्ड होतो, तेव्हाच करतो. जर फलंदाज सीमारेषेवर झेललाब झाला असेल तर तसे करत नाही."
सिराजच्या या उत्तरानंतर शमी म्हणाला की, 'मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. तु वेगवान गोलंदाज आहेस आणि अशा उड्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न कर."
विशेष म्हणजे, शमी स्वतः एक महान वेगवान गोलंदाज आहे. तो सध्या टीम इंडियातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. दुखापतीपासून दूर राहावे यासाठी तो अनेकदा त्याच्या फिटनेसवर मेहनत करताना दिसला आहे. कारण दुखापती ही वेगवान गोलंदाजांसाठी मोठी समस्या आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराह दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियाकडून खेळत नाही. अशा परिस्थितीत शमीने मोहम्मद सिराजला दिलेला सल्ला नक्कीच कामाचा असून सिराज दुखापत होण्यापासून स्वत:ला दूर ठेवेल अशी अपेक्षा आहे.