French Open 2024 Womens Singles Final : जागतिक नंबर-वन टेनिसपटू इगा स्विटेकने फ्रेंच ओपन २०२४ मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी (८ जून) रोलँड गॅरोसच्या फिलिप चॅटियर कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इगा स्विटेकने इटलीच्या जास्मिन पाओलिनीचा ६-२, ६-१ असा पराभव केला. अंतिम सामना १ तास ८ मिनिटे चालला.
१२वी मानांकित जास्मिन पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.
पोलंडच्या इंगा स्विटेकचे हे चौथे फ्रेंच ओपन आणि एकूण पाचवे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. इगाने २०२०, २०२२ आणि २०२३ मध्ये फ्रेंच ओपन जिंकली होती.
म्हणजेच तिने सलग तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकली आहे. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत इगाने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हा हिचा ६-२, ५-७, ६-४ असा पराभव केला होता. २०२२ मध्ये यूएसए ओपन जिंकण्यातही इंगा यशस्वी ठरली होती.
जास्मिन पाओलिनीने फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत रशियाच्या मिरा अँड्रीवाचा ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर इंगा स्विटेकने अमेरिकेची स्टार टेनिसपटू कोको गफचा ६-२, ६-४ असा पराभव करत विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता. आता इगाने पाओलिनीचा पराभव करून फ्रेंच ओपनमध्ये सलग २१वे विजय संपादन केले. फ्रेंच ओपन क्ले कोर्टवर खेळली जाते.
२३ वर्षीय इगा स्विटेकने २०१९ मध्ये तिचा पहिला ग्रँड स्लॅम सामना खेळला. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्येच तिने पहिले विजेतेपद पटकावले. त्यावेळी फ्रेंच ओपन जिंकली होती. यानंतर २०२१ च्या मोसमात इगाला एकही ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकता आले नाही. पण २०२२ पासून तिने पुन्हा विजयाची गती पकडली.
दुसरीकडे, रविवारी (९ जून) पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराझचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. स्पॅनिश खेळाडू अल्काराजने उपांत्य फेरीच्या लढतीत इटलीच्या यानिक सिनरचा २-६, ६-३, ३-६, ६-४, ६-३ असा पराभव केला. तर अलेक्झांडर झ्वेरेव्हने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा २-६, ६-२, ६-४, ६-२ असा पराभव केला होता.