ICC Rankings : एकदिवसीय क्रिकेट रँकिंगमध्ये मोहम्मद सिराजची झेप, बनला जगातील अव्वल गोलंदाज
ICC Dne Day Cricket Rankings : आयसीसीने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली असून भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने या यादीत टॉप नंबर मिळवला आहे.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय मालिकेतील तिसरा व अंतिम वन डे सामना मंगळवारी खेळला गेला. हा सांना भारताने ९० धावांनी जिंकून किवींना व्हाईट वॉश दिला. पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घातलेल्या टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी दोघांना विश्रांती दिली होती. सिराजला मंगळवारीच आयसीसी मेन्स ODI टीम ऑफ द ईयर २०२२ मध्ये स्थान मिळाले होते. त्यानंतर आज सिराजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला असून आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत वनडे गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये सिराज अव्वल टॉप वर पोहोचला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सिराजने ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवुड आणि न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ड यांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात सिराजने दमदार प्रदर्शन केले होते. या मालिकेत सिराजने दोन सामन्यात ११.२० च्या सरासरीने एकूण पाच विकेट घेतल्या होत्या. सिराजने मागील एक वर्षात वनडे फॉर्मेटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दमदार प्रदर्शन केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपूर्वी भारताने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळली होती. त्या मालिकेतही सिराजने उत्तम प्रदर्शन केले होते.
श्रीलंकेविरुद्ध सिराजने एकूण ९ विकेट घेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. दरम्यान भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या क्रमवारीतही ११ स्थानांनी सुधारणा झाली आहे. आयसीसी मेन्स फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम टॉप वर कायम आहे. विराट कोहलीला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो १७ व्या स्थानावर घसरला आहे. शुभमन गिल सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर रोहित शर्माला दोन स्थान पुढे सरकत ९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.