Hockey world cup 2023 india: हॉकी विश्वचषक २०२३ च्या सामन्यांना आजपासून (१३ जानेवारी) सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारताचा सामना सामना स्पेनशी होईल. भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारत आणि स्पेन यांच्यातील सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
१३ ते २९ जानेवारी दरम्यान ओडिशातील भुवनेश्वर आणि राउरकेला येथे हा वर्ल्डकप खेळवला जात आहे. जगातील अव्वल १६ संघांमध्ये ही स्पर्धा रंणार आहे. या १६ संघांची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
ग्रुपमधील अव्वल संघ क्वार्टर फायनलमध्ये जाणार
प्रत्येक गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना क्रॉसओव्हर फेरी खेळावी लागेल. क्रॉसओव्हर सामन्यातील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करतील. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतील विजयी संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील आणि शेवटी २ संघ अंतिम फेरीत खेळतील आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेले दोन्ही संघ कांस्यपदकासाठी सामना खेळतील.
जाणून घ्या काय आहे टायब्रेकर नियम
पूल टप्प्यातील प्रत्येक विजयासाठी, संघाला २ गुण आणि अनिर्णित राहिल्यास १ गुण मिळेल. तथापि, जर २ संघ एकाहून अधिक गुणांवर बरोबरीत असतील तर, प्रत्येक गटातील संघांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी टायब्रेकरचा नियम लागू होईल.
जर दोन संघ समान गुणांवर बरोबरीत असतील, तर गट टप्प्यात सर्वाधिक विजय मिळवणारा संघ पूलमध्ये उच्च स्थानावर मानला जाईल. जर गुणांची आणि विजयी सामन्यांची संख्याही सेम असेल तर गोल फरक म्हणजेच केलेल्या गोलची संख्या आणि खाल्लेल्या गोलची संख्या यामधील फरक लागू होईल. ज्याचे आकडे चांगले असतील तो पुढील फेरीत प्रवेश करेल.
आजचे (१३ जानेवारी) सामने-
अर्जेंटिना विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दुपारी १:३० वा.)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध फ्रान्स (दुपारी ३ वाजता)
इंग्लंड विरुद्ध वेल्स (सायंकाळी ५ वाजता)
भारत विरुद्ध स्पेन ( सायंकाळी ७ वाजता)
भारतीय संघ-
गोलरक्षक: क्रिशन बी पाठक आणि पीआर श्रीजेश
डिफेंडर्स: हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जर्मनप्रीत सिंग आणि नीलम संजीव
मिडफिल्डर: विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग आणि आकाशदीप सिंग
फॉरवर्ड्स: मनदीप सिंग, ललित उपाध्याय, अभिषेक आणि सुखजित सिंग
पर्यायी खेळाडू: राजकुमार पाल आणि जुगराज सिंग.
संबंधित बातम्या