मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hockey : गोलकीपर नीना असईकर यांचे निधन, दोन वर्ल्डकपमध्ये केलं होतं भारताचं प्रतिनिधित्व

Hockey : गोलकीपर नीना असईकर यांचे निधन, दोन वर्ल्डकपमध्ये केलं होतं भारताचं प्रतिनिधित्व

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 23, 2023 10:40 PM IST

भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी खेळाडू नीना असईकर यांचे निधन झाले आहे. असईकर यांनी १९७४ आणि १९७९ सालच्या दोन वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रनिधित्व केले होते.

nina asiakar
nina asiakar

भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी गोलकीपर नीना असईकर-राणे यांचे दीर्घ आजाराने आज सायंकाळी (२३ जानेवारी) निधन झाले आहे. त्या ७५ वर्षांच्या होत्या. असईकर या १९७४ आणि १९७९ सालच्या भारतीय हॉकी वर्ल्डकप संघात होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.

१९७४ साली पॅरिस येथे झालेल्या महिलांच्या हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताने सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. तसेच १९७५ साली चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या सहा राष्ट्रीय बेगम रसूल आंतरराष्ट्रीय करंडक स्पर्धा भारताने जिंकली होती. त्या स्पर्थेत भारताला चॅम्पियन बवण्यात असईकर यांचा मोलाचा वाटा होता. ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती.

अर्जुन पुरस्कार न मिळाल्याची खंत

नीना असईकर यांनी १० वर्षे हॉकीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या या कामगिरीची दखल महाराष्ट्र सरकारने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले होते. पण केंद्र सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल न घेतल्याची खंत त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी करूनही त्यांना नेहमीच अर्जुन पुरस्कारार्थींच्या यादीतून डावलण्यात आले. परिणामता त्यांना कधीही अर्जुन पुरस्कार मिळू शकला नाही.

संजाण येथे उभारले मतिमंदांसाठी वसतीगृह

नीना असईकर यांची मुलगी मतिमंद आहे. त्यामुळे त्यांनी या मुलांच्या वेदना जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी गुजरात राज्यात पारशी धर्मियांचे पवित्र स्थान असलेल्या संजाण गावी मतिमंदाचे वसतीगृह उभारले आहे. ते वसतीगृह सुरळीत चालावे आणि तेथे असलेल्या मतिमंद मुलांना सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी अनेक कंपन्यांकडून निधीही गोळा केला होता. या वसतीगृहाकडे त्या जातीने लक्ष देत होत्या.

WhatsApp channel

संबंधित बातम्या