मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PAK vs ENG T20: बाबर आणि रिझवाननं इंग्लंडला धुतलं, T20 मध्ये पहिल्यांदाच 'असं' घडलं

PAK vs ENG T20: बाबर आणि रिझवाननं इंग्लंडला धुतलं, T20 मध्ये पहिल्यांदाच 'असं' घडलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 23, 2022 11:03 AM IST

babar azam and rizwan partnership ENG vs PAK 2nd T20: आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान जोडीने इतिहास रचला आहे. या सलामी जोडीने लक्ष्याचा पाठलाग करताना २०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे.

PAK vs ENG
PAK vs ENG

इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये ७ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (२२ सप्टेंबर) कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा १० विकेट्सनी पराभव केला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने ते १९.३ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने शतकीय खेळी केली. तर मोहम्मद रिझवानने त्याला उत्तम साथ दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २०३ धावांची ऐतिहासिक भागिदारी रचली.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीच्या जोडीने २०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे.

बाबर आझमने ६६ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ११० धावा केल्या. आझमचे हे T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. त्याचवेळी रिझवानने केवळ ५१ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. रिझवानने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार मारले.

टी-20 क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सलामी जोडीच्या सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रमही या दोघांच्या नावावर आहे. बाबर आणि रिझवान यांनी २०२१ मध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९७ धावांची भागीदारी केली होती. याशिवाय बाबर-रिझवान ही एकमेव जोडी आहे, ज्यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना चार वेळा १५० हून अधिक धावांची सलामी दिली आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १९९ धावा केल्या. कर्णधार मोईन अलीने २३ चेंडूंत ४ षटकार आणि चौकारांसह नाबाद ५५ धावांची खेळी केली. मोईनशिवाय बेन डकेट (४३), हॅरी ब्रुक (३१) आणि अॅलेक्स हेल्स (३०) यांनी उपयुक्त योगदान दिले. इंग्लंडने शेवटच्या १० षटकांत ११९ धावा केल्या.

WhatsApp channel

संबंधित बातम्या