Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सचा पहिला पराभव, हरियाणा स्टीलर्सने सहज चारली धुळ
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सचा पहिला पराभव, हरियाणा स्टीलर्सने सहज चारली धुळ

Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सचा पहिला पराभव, हरियाणा स्टीलर्सने सहज चारली धुळ

Oct 24, 2024 11:01 PM IST

Jaipur Pink Panthers vs Haryana Steelers : हरियाणा स्टीलर्सचा दोन सामन्यातील हा पहिला विजय असून आता ते आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. संघासाठी विनयने सुपर १०, नवीनने ६ आणि शिवम पटारेने ४ गुण मिळवले.

Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सचा पहिला पराभव, हरियाणा स्टीलर्सने सहज चारली धुळ
Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सचा पहिला पराभव, हरियाणा स्टीलर्सने सहज चारली धुळ

प्रो कबड्डी लीग २०२४ चा १४वा सामना आज (२४ ऑक्टोबर) हरियाणा स्टीलर्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हरयाणाने दोनवेळचा चॅम्पियन जयपूरला ३७-२५ अशी धुळ चारली.

हरियाणा स्टीलर्सचा दोन सामन्यातील हा पहिला विजय असून आता ते आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. संघासाठी विनयने सुपर १०, नवीनने ६ आणि शिवम पटारेने ४ गुण मिळवले.

जयपूर पिंक पँथर्सला तीन सामन्यांत पहिला पराभव पत्करावा लागला आहे. आज संघाचा कर्णधार आणि रेड मशिन अर्जुन देशवाल संघासाठी विशेष काही करू शकला नाही आणि केवळ ३ गुण मिळवू शकला. जयपूरचा डिफेन्स या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप दिसला.

सामन्याच्या सुरुवातीलाच हरियाणा स्टीलर्सने ३-० अशी शानदार सुरुवात केली. मात्र मोहम्मद रेझा शादलू तिसऱ्याच मिनिटाला बाद झाला. असे असूनही, खेळाच्या पहिल्या ५ मिनिटांत हरयाणा स्टीलर्स ४-२ ने आघाडीवर होते.

जयपूरचा कर्णधार पहिल्या रेडनंतर खेळाची पहिली १० मिनिटे मॅटपासून दूर राहिला. अर्जुन देशवाल मॅटबाहेर असल्यामुळे जयपूरला सामन्यात गुण मिळवता आले नाहीत आणि हरियाणाने याचा फायदा घेत पहिल्या १० मिनिटांच्या खेळात तीन गुणांची आघाडी कायम राखली.

सामन्याच्या १३व्या मिनिटाला विनयने सुपर रेड मारत आणखी तीन गुण मिळवले आणि हरियाणाला १३-६ अशा आघाडीवर नेले. यानंतर विनयने १५व्या मिनिटाला आणखी दोन खेळाडूंना बाद करत जयपूर पिंक पँथर्सला सामन्यात प्रथमच ऑलआऊट करून स्कोअर १७-७ असा केला.

देशवाल बाद झाल्यानंतर जयपूरचा डिफेन्स कमकुवत झाला आणि त्यामुळे संघ पूर्वार्धात ९ गुणांनी मागे पडला. पूर्वार्धात हरियाणाला २०-११ अशी आघाडी मिळवून देण्यात विनयच्या ९ आणि नवीनच्या ५ गुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

उत्तरार्धात जयपूर पिंक पँथर्ससाठी चांगली बातमी म्हणजे त्यांचा कर्णधार अर्जुन मॅटवर परतला होता. पुनरागमनानंतर त्याने सामन्याच्या २५व्या मिनिटाला आपले खाते उघडले. अर्जुनच्या आगमनानंतरही हरियाणाचा गुण मिळविण्याचा ट्रेंड कायम राहिला. २६व्या मिनिटाला शिवम पटारेने सुपर रेड करत हरियाणाला २५-१४ अशी आघाडी मिळवून दिली. अवघ्या दोन मिनिटांनंतर विनयने सुपर टॅकलमधून स्वत:ला वाचवले आणि एक गुण मिळवला.

यानंतर पुढच्याच रेडमध्ये, विनयने आणखी एक गुण घेत त्याच्या कारकिर्दीतील १०वा सुपर १० आणि या मोसमातील पहिला सुपर १० पूर्ण केला. आता सामना संपायला फक्त १० मिनिटे उरली होती आणि हरियाणा स्टीलर्सकडे २८-१६ अशा स्कोअरसह १२ गुणांची आघाडी होती.

यानंतर हरियाणा स्टीलर्सने जयपूर पिंक पँथर्सला दुसऱ्यांदा सामन्यात ऑलआऊट केले आणि गुणसंख्या ३१-१७ अशी नेली. जयपूरचा संघ आता सामन्यात खूप मागे पडला होता आणि अर्जुनला प्रयत्न करूनही जयपूरला सामन्यात परत आणता आले नाही. हरियाणाने शेवटच्या पाच मिनिटांत खेळावर वर्चस्व राखले आणि जयपूर पिंक पँथर्सला ३७-२५ अशी विजयी हॅट्ट्रिक करण्यापासून रोखले.

Whats_app_banner