new captain for India vs Ireland t20 series : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचे सामने संपल्यानंतर भारताला ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंडला जावे लागणार आहे.
भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध ३ टी-20 सामने (१८, २० आणि २३ ऑगस्ट) खेळायचे आहेत. हे तिन्ही सामने डब्लिनमध्ये होणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आयर्लंड दौऱ्यावर युवा खेळाडूंनी सजलेला संघ पाठवू शकतो. हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांना आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती मिळू शकते, जेणेकरून वर्ल्ड कप आणि आशिया कप पाहता त्यांच्या कामाचा बोजा कमी करता येईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘अद्याप काहीही ठरलेले नाही आणि एकदिवसीय आणि टी-20 नंतर हार्दिकला कसे वाटते यावर ते अवलंबून असेल. यामध्ये भरपूर प्रवास असेल आणि फ्लोरिडा ते डब्लिन प्रवास करण्यासाठी फक्त तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहतो.’
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला T20 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा उपकर्णधारही असणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्याचा सपोर्ट स्टाफ विक्रम राठोड (फलंदाजी प्रशिक्षक), पारस म्हांबरे (गोलंदाजी प्रशिक्षक) यांनाही आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील.