IPL 2023: गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज शुभमन गिलने काल (सोमवारी, १५ मे २०२३) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. गिलने अवघ्या ५८ चेंडूत १३ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १०१ धावा केल्या. या सामन्यात शुभमन गिलने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रमही मोडला आहे. त्याने एकही षटकार न मारता २२ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. सचिन तेंडुलकरने २३ चेंडूत अशी कामगिरी केली होती.
षटकार न मारता सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा शुभमन गिल आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. गिलने केवळ २२ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. गिलच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. आयपीएल २०१० मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात षटकार न मारता २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. आता गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
गुजरात टायटन्सकडून शतक झळकावणारा गिल पहिला फलंदाज ठरला. गिलने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये ४८ च्या सरासरीने आणि १४६.१९ च्या स्ट्राइक रेटने ५७६ धावा केल्या आहेत.यादरम्यान त्याच्या बॅटमधून एका शतकाशिवाय ४ अर्धशतकेही ठोकली आहेत.
शुभमन गिलने आयपीएल २०२३ मध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात त्याने १६ सामन्यांमध्ये ३४.५० च्या सरासरीने आणि १३२ च्या स्ट्राईक रेटने ४८३ धावा केल्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता. गेल्या हंगामात त्याच्या बॅटमधून ५१ चौकार आणि ११ षटकार निघाले होते.
संबंधित बातम्या