GT vs MI IPL Qualifier 2 : मुंबई-गुजरातमध्ये रंगणार क्वालिफायर-2 चा थरार, कोणता संघ मजबूत? पाहा
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  GT vs MI IPL Qualifier 2 : मुंबई-गुजरातमध्ये रंगणार क्वालिफायर-2 चा थरार, कोणता संघ मजबूत? पाहा

GT vs MI IPL Qualifier 2 : मुंबई-गुजरातमध्ये रंगणार क्वालिफायर-2 चा थरार, कोणता संघ मजबूत? पाहा

May 26, 2023 03:22 PM IST

gt vs mi qualifier 2 preview : IPL 2023 च्या क्वालिफायर-2 मध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.

GT vs MI IPL Qualifier 2
GT vs MI IPL Qualifier 2

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या क्वालिफायर-2 मध्ये आज (२६ मे) गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (GT) सामना पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्सशी (MI) होणार आहे. गुजरात टायटन्सला क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे रोहित ब्रिगेडने एलिमिनेट सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर ८१ धावांनी विजय मिळवला. उभय संघांमधील हा ब्लॉकबस्टर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल.

मुंबईची फलंदाजी मजबूत

मुंबई इंडियन्सचा लखनौविरुद्धचा मोठा विजय गुजरातसाठी धोक्याची घंटा आहे. यंदाच्या मोसमात मुंबईच्या कामगिरीत चढ-उतार होत असले तरी आता योग्य वेळी त्यांचा संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि टीम डेव्हिड यांनी आतापर्यंतच्या आव्हानांचा चांगला सामना केला आहे. त्यांच्याशिवाय युवा फलंदाज नेहल वढेराही प्रभाव पाडत आहे, तर रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामीची जोडीही आपली भूमिका बजावत आहे.

आकाश मढवालकडे नजरा

जर आपण मुंबई इंडियन्सच्या बॉलिंग युनिटबद्दल बोललो तर अनकॅप्ड बॉलर आकाश मढवालने जबरदस्त खेळ दाखवला आहे. चेन्नईत बुधवारी (२४ मे) झालेल्या एलिमिनेटर सामन्यात आकाशने ५ धावांत ५ बळी घेतले. मुंबईच्या इतर गोलंदाजांमध्ये, अनुभवी लेगस्पिनर पियुष चावला आणि वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ यांनीही प्रभावी गोलंदाजी केली आहे.

शुभमन गिलवर संघाची मदार

दुसरीकडे, गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. गुजरातच्या सर्व खेळाडूंनी आतापर्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे.

गिलने आतापर्यंत १५ सामन्यात ७२२ धावा केल्या आहेत. गुजरातसाठी विजय शंकरने त्याच्यानंतर सर्वाधिक धावा केल्या आहेत, पण तो गिलपेक्षा ४२१ धावांनी मागे आहे. शंकरच्या नावावर १२ सामन्यात ३०१ धावा आहेत. आरसीबीच्या फाफ डुप्लेसिसकडून ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी गिलला फक्त ८ धावांची गरज आहे.

हार्दिक पंड्याची खराब कामगिरी चिंतेची बाब

तर, कर्णधार हार्दिक पंड्याची खराब कामगिरी गुजरातसाठी चिंतेची बाब आहे. गेल्या ५ सामन्यांमध्ये त्याने केवळ ४५ धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलरही मधल्या फळीत मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या तीन सामन्यांत त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

गुजरातसाठी शमी-रशीद महत्त्वाचे ठरणार

गुजरात टायटन्सची गोलंदाजी पूर्णपणे मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि राशिद खान यांच्यावर अवलंबून आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी २६ विकेट्ससह पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. याचबरोबर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान २५ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबईचा संघ मजबूत

मुंबई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत ३ सामने झाले आहेत, ज्यामध्ये रोहितचा संघ दोन वेळा विजयी झाला आहे. त्याचवेळी गुजरात टायटन्सने एक सामना जिंकला आहे. गेल्या मोसमात उभय संघांमधला पहिला सामना झाला होता, ज्यात मुंबईने ५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर चालू हंगामात प्रथम गुजरातने ५५ धावांनी विजयाची चव चाखली, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबईने २७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.

Whats_app_banner