मराठी बातम्या  /  क्रीडा  /  GT Vs MI Qualifier 2 Highlights : मुंबईला हरवून गुजरात फायनलमध्ये, मोहित शर्माचे १० धावांत ५ विकेट

GT Vs MI Qualifier 2 Highlights : मुंबईला हरवून गुजरात फायनलमध्ये, मोहित शर्माचे १० धावांत ५ विकेट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 26, 2023 07:02 PM IST

GT Vs MI IPL Score Qualifier 2 : आयपीएल 2023 चा क्वालिफायर २ सामना आज मुंबई आणि गुजरात यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा ६२ धावांनी पराभव झाला. या विजयासह गुजरात फायनलमध्ये पोहोचली आहे.

GT Vs MI IPL Live Score Qualifier 2
GT Vs MI IPL Live Score Qualifier 2

IPL Cricket Score, Qualifier 2 GT vs MI 2023 : गुजरात टायटन्सचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी शुक्रवारी (२६ मे) क्वालिफायर-2 मध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातने ६२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातने २० षटकांत ३ बाद २३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १८.२ षटकांत १७१ धावांवर गारद झाला.

GT Vs MI IPL Score Qualifier 2 updates

गुजरातचा धमाकेदार विजय

गुजरात टायटन्सने IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २६ मे (शुक्रवार) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या क्वालिफायर-2 सामन्यात गुजरातने पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव केला. मुंबईला विजयासाठी २३४ धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ १८.२ षटकांत १७१ धावांवर गारद झाला. आता २८ मे रोजी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूंत ६१ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. मात्र, सूर्याचा डाव गिलसमोर फिका पडला. सूर्याशिवाय तिलक वर्माने अवघ्या १४ चेंडूंत पाच चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४३ धावांचे योगदान दिले, तर कॅमेरून ग्रीनने ३० धावांची खेळी केली. याशिवाय बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत.

गुजरातकडून वेगवान गोलंदाज मोहित शर्माने २.२ षटकांत १० धावा देत ५ बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाले.

गुजरातचा डाव

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. यष्टिरक्षक वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी मिळून ६.२ षटकात ५४ धावांची तुफानी भागीदारी केली. फिरकीपटू पियुष चावलाने साहाला यष्टीचीत करून ही भागीदारी तोडली. साहाने तीन चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या. पहिली विकेट पडल्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यादरम्यान गिलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत अवघ्या ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर गिलने षटकारांचा पाऊस पाडला. आकाश मढवालच्या एका षटकात गिलने ३ षटकार ठोकले. त्यानंतर १३व्या षटकात त्याने पियुष चावलालाही दोन षटकार आणि एक चौकार लगावला. गिलची झंझावाती फलंदाजी सुरूच राहिली आणि त्याने कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर सिंगल घेत शतक पूर्ण केले. गिलने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, ज्यात ८ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. गिलने सामन्यात ६० चेंडूत १२९ धावा केल्या. त्याने १० षटकार आणि ७ चौकार मारले.

आयपीएल 2023 मधील शुभमन गिलचे हे तिसरे शतक होते. गिलने या मोसमाच्या सुरुवातीला साखळी फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली होती.

GT Vs MI Live Score : सूर्यकुमार यादवचे अर्धशतक

सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने षटकारा मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. १४ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ४ बाद १४९ अशी आहे. त्यांना आता ३६ चेंडूत ८५ धावांची गरज आहे.

GT Vs MI Live Score : ग्रीन बाद

गुजरात टायटन्ससाठी जोशुआ लिटलने १२व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनला क्लीन बोल्ड केले. ग्रीन २० चेंडूत ३० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. मुंबई इंडियन्सने १२ षटकांत ४ गडी गमावून १२८ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव २६ चेंडूत ३७ आणि विष्णू विनोद तीन चेंडूत तीन धावांवर खेळत आहेत. मुंबईला विजयासाठी शेवटच्या आठ षटकात १०६ धावा करायच्या आहेत.

GT Vs MI Live Score : १० षटकात ११० धावा

मुंबई इंडियन्सच्या डावातील अर्धी षटके संपली आहेत. मुंबईने १० षटकात ३ गडी बाद ११० धावा केल्या आहेत. त्याला आता विजयासाठी उर्वरित १० षटकांत १२३ धावा करायच्या आहेत. तीन विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी डाव सावरला आहे. सूर्यकुमार २१ चेंडूत ३३ आणि कॅमेरून ग्रीन १५ चेंडूत २१ धावांवर खेळत आहेत.

GT Vs MI Live Score : पॉवरप्लेमध्ये ७२ धावा

मुंबई इंडियन्सने सहा षटकांत तीन गडी गमावून ७२ धावा केल्या आहेत. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तिलक वर्माच्या रूपाने त्यांना तिसरा धक्का बसला. राशिद खानने वर्माला क्लीन बोल्ड केले. टिळक वर्माने झटपट धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. टिळकने १४ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. नऊ चेंडूत १२ धावा करून सूर्यकुमार यादव क्रीजवर आहे. तर ४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेलेला कॅमेरून ग्रीन फलंदाजीसाठी परतला आहे.

GT Vs MI Live Score : रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप

या सामन्यातही रोहित शर्माची बॅट चालली नाही. तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने रोहितला बाद केले. रोहितने सात चेंडूंत आठ धावा केल्या. त्याने एक चौकार मारला. मुंबईने तीन षटकांत दोन गडी बाद २९ धावा केल्या आहेत. तिलक वर्मा सात आणि सूर्यकुमार यादव पाच धावा करून खेळत आहेत. कॅमेरून ग्रीन तीन चेंडूत चार धावा केल्यानंतर दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला आहे.

GT Vs MI Live Score : मुंबई इंडियन्सला पहिला धक्का

२३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पहिली विकेट गमावली आहे. पहिल्याच षटकात त्यांना मोहम्मद शमीने पहिला धक्का दिला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या नेहल वढेराला शमीने बाद केले. वृद्धीमान साहाने विकेटच्या मागे वढेराचा झेल घेतला. त्याने तीन चेंडूत चार धावा केल्या. सध्या रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन क्रीजवर आहेत.

GT Vs MI Live Score : गुजरातच्या २३३ धावा

शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने २० षटकांत ३ बाद २३३ धावा केल्या. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक १२९ धावा केल्या. त्याने ६० चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि १० षटकार मारले. गिलचे हे चार सामन्यातील तिसरे शतक आहे. साखळी फेरीतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली. 

गिलशिवाय साई सुदर्शनने ३१ चेंडूत ४३ धावा केल्या. तो रिटायर आऊट झाला. कर्णधार हार्दिक पंड्याने १३ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. रिद्धिमान साहाने १६ चेंडूत १८ धावा केल्या. रशीद खान दोन चेंडूत पाच धावा करून नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सकडून आकाश मढवाल आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

GT Vs MI Live Score : शुभमन गिल बाद

शुभमन गिल ६० चेंडूत १२९ धावा करून बाद झाला. १७व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याला आकाश मधवालने बाद केले. मधवालने गिलला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १० षटकार मारले.

GT Vs MI Live Score : इशान किशन दुखापतग्रस्त

मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन १६व्या षटकाच्या अखेरीस जखमी झाला. मैदानावर त्याची ख्रिस जॉर्डनशी टक्कर झाली. जॉर्डनचा कोपर किशनच्या डोळ्याला लागला. त्यानंतर इशान मैदानाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी विष्णू विनोद विकेटकीपिंग करत आहे.

GT Vs MI Live Score : शुभमन गिलचं शतक

मुंबईविरुद्धच्या क्वालिफायर -2 सामन्यात गुजरातच्या शुभमन गिलने शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या ४९ चेंडूत शतक पूर्ण केले.

शुभमन गिलचे हे आयपीएलच्या चालू हंगामातील तिसरे शतक आहे. त्याने ४९ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या आहेत. गिलने या मोसमाच्या सुरुवातीला साखळी फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली होती.

GT Vs MI Live Score : शुभमन गिलचं अर्धशतक

शुभमन गिलने या मोसमातील पाचवे अर्धशतक ठोकले. त्याने ३२ चेंडूत पन्नास धावा पूर्ण केल्या. गुजरातने १० षटकात एक विकेट गमावत ९१ धावा केल्या आहेत. गिल ३४ चेंडूत ५७ धावांवर खेळत आहे. त्याने आतापर्यंत तीन चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. साई सुदर्शनने १० चेंडूत एका चौकाराच्या मदतीने १३ धावा केल्या.

GT Vs MI Live Score : ऋद्धिमान साहा पॅव्हेलियनमध्ये

पियुष चावलाने मुंबई इंडियन्सला पहिले यश मिळवून दिले. सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने ऋद्धिमान साहाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. १६ चेंडूत १८ धावा करून साहाला ईशान किशनने यष्टीचीत केले. गुजरातने सात षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ५९ धावा केल्या आहेत. शुभमन गिल २३ चेंडूत ३५ तर साई सुदर्शन तीन चेंडूत चार धावा करून खेळत आहे.

GT Vs MI Live Score : ६ षटकात बिनबाद ५० धावा

गुजरात टायटन्सच्या डावाचा पॉवरप्ले संपला आहे. त्यांनी सहा षटकांत बिनबाद ५० धावा केल्या आहेत. शुभमन गिल २० चेंडूत ३१ धावा तर ऋद्धिमान साहा १६ चेंडूत १८ धावा करून खेळत आहे. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. मुंबई पहिल्या विकेटच्या शोधात आहे. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर टिम डेव्हिडने ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर शुभमन गिलचा झेल सोडला.

GT Vs MI Live Score : गुजरातचा डाव सुरू

मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरातच्या डावाची सुरुवात झाली आहे. शुबमन गिलसोबत रिद्धिमान साहा क्रीझवर आहे. गुजरातने दोन षटकांत कोणतेही नुकसान न करता १३ धावा केल्या आहेत. गिल नऊ आणि साहा चार धावा करून खेळत आहेत.

GT Vs MI Live Score : दोन्ही संघ

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल

GT Vs MI Live Score : मुंबईची प्रथम गोलंदाजी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकली. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत एक बदल झाला आहे. रोहितने हृतिक शोकीनच्या जागी कुमार कार्तिकेयचा संघात समावेश केला आहे. तर गुजरातच्या संघात दोन बदल आहेत. जोशुआ लिटल आणि बी साई सुदर्शनचा संघात समावेश केला आहे. दासून शनाका आणि दर्शन नळकांडे यांना वगळण्यात आले आहे.

GT vs MI Live : सामना ८ वाजता सुरू होईल

मैदानाची स्थिती पाहून पंचांनी नाणेफेकीची नवीन वेळ ठरवली आहे. नाणेफेक संध्याकाळी ७:४५ वाजता होईल आणि सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.

GT vs MI Live : थोड्याच वेळात टॉस

पावसामुळे नाणेफेक अद्याप झालेली नाही. पाऊस थांबला आहे. दोन्ही संघ मैदानात सराव करत आहेत. खेळपट्टीच्या वरच्या भागातून कव्हर्स काढण्यात आली आहेत. नाणेफेक काही वेळात होईल अशी आशा आहे.

GT vs MI Live : सामन्याआधी मुसळधार पाऊस

अहमदाबादमध्येमुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत नाणेफेक उशीराने होणार आहे.

WhatsApp channel