मराठी बातम्या  /  क्रीडा  /  GT vs CSK Highlights : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव, गुजरात शेवटच्या षटकात विजयी

GT vs CSK Highlights : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव, गुजरात शेवटच्या षटकात विजयी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 31, 2023 07:03 PM IST

IPL Cricket Score GT vs CSK : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने शेवटच्या षटकांत लक्ष्य गाठले.

GT vs CSK Live Score
GT vs CSK Live Score

IPL 2023 Match 1, Gujarat Titans vs Chennai Super Kings : IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यात गुजरातला विजयासाठी १७९ धावा करायच्या होत्या, जे त्यांनी शेवटच्या षटकात पूर्ण केल्या. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने ६३ धावांची खेळी केली.

GT vs CSK Score updates

गुजरात विजयी

शुभमन गिलच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएलच्या १६व्या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने २० षटकात ७ विकेट गमावत १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.२ षटकांत ५ बाद १८२ धावा करत सामना जिंकला.

शेवटच्या तीन षटकात गुजरातला ३० धावा करायच्या होत्या, अशा परिस्थितीत सामना रोमांचक वळणावर आला होता. राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी शानदार खेळ दाखवत चेन्नईचा विजय हिरावून घेतला. तेवतियाने नाबाद १५ धावांची खेळी खेळली आणि रशीदने १० धावा केल्या. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याचवेळी विजय शंकरने २७ आणि ऋद्धिमान साहाने २५ धावा केल्या. सीएसकेकडून राजवर्धन हंगरगेकरने सर्वाधिक ३ बळी घेतले.

चेन्नईचा डाव

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने २३ धावांची खेळी केली. धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या ७ बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत १४ धावा केल्या.

गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.

GT vs CSK Live Score : हार्दिक पांड्या बाद

१३व्या षटकात हार्दिक पांड्या बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला क्लीन बोल्ड केले. हार्दिकने ११ चेंडूत आठ धावा केल्या. गुजरातने १३ षटकात ३ विकेट गमावत ११४ धावा केल्या आहेत. शुभमन गिल ५१ आणि विजय शंकर तीन धावांवर खेळत आहे. 

GT vs CSK Live Score : शुभमन गिलचे अर्धशतक 

शुभमन गिलने १२व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. मिचेल सँटनरच्या दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेत त्याने ५० धावांचा टप्पा गाठला. गुजरातने १२ षटकांत २ बाद १११ धावा केल्या आहेत. शुभमन गिल ३१ चेंडूत ५१ आणि कर्णधार हार्दिक पंड्या १० चेंडूत ८ धावांवर खेळत आहे.

GT vs CSK Live Score : साई सुदर्शन गुजरातचा इम्पॅक्ट प्लेयर

गुजरात टायटन्सने साई सुदर्शनला त्यांचा इम्पॅक्ट प्लेयर बनवले. केन विल्यमसनची जागा सुदर्शनने घेतली. क्षेत्ररक्षण करताना विल्यमसनला दुखापत झाली. त्यानंतर तो सामन्यातून बाहेर पडला. साहा बाद झाल्यानंतर सुदर्शनला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आहे.

GT vs CSK Live Score : गुजरातला पहिला धक्का 

राजवर्धन हुंगरगेकरने गुजरात टायटन्सला पहिला धक्का दिला. त्याने अनुभवी फलंदाज रिद्धिमान साहाला शिवम दुबेकरवी झेलबाद केले. साहाने १६ चेंडूत २५ धावा केल्या.

GT vs CSK Live Score : तुषार देशपांडे बनला चेन्नईचा इम्पॅक्ट प्लेयर 

चेन्नईने गुजरातचा डाव सुरू होण्यापूर्वी इम्पॅक्ट प्लेअरला मैदानात उतरवले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या संघाने अंबाती रायडूच्या जागी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेची निवड केली आहे. तुषार हा आयपीएलचा पहिला इम्पॅक्ट प्लेयर ठरला.

GT vs CSK Live Score : गुजरातसमोर १७९ धावांचे लक्ष्य 

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने २३ धावांची खेळी केली. धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या ७ बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत १४ धावा केल्या. 

गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.

GT vs CSK Live Score : चेन्नईची सातवी विकेट पडली

१६३ धावांवर चेन्नई सुपर किंग्जची सातवी विकेट पडली. शिवम दुबे १८ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला राशिद खानकरवी झेलबाद केले. आता मिचेल सँटनर आणि महेंद्रसिंग धोनी क्रीजवर आहेत. १९ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात १६५ आहे.

GT vs CSK Live Score : चेन्नईचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

१५१ धावांवर चेन्नईचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. ऋतुराज गायकवाड ५० चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत नऊ षटकार आणि चार चौकार मारले. आता शिवम दुबेसोबत रवींद्र जडेजा क्रीजवर आहे.

GT vs CSK Live Score : चेन्नईची चौथी विकेट पडली

१२१ धावांवर चेन्नईची चौथी विकेट पडली. अंबाती रायुडू १२ चेंडूत १२ धावा करून बाद झाला आहे. जोशुआ लिटलने त्याला क्लीन बोल्ड केले. १३ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावा आहे. ऋतुराज गायकवाड ३७ चेंडूत ७६ धावा करून खेळत आहे.

GT vs CSK Live Score : चेन्नई १०० च्या पुढे

चेन्नई सुपर किंग्जच्या धावसंख्येने तीन विकेट गमावून १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऋतुराज गायकवाड तुफानी फलंदाजी करत ३० चेंडूत ६३ धावा करत खेळत आहे. त्याला दुसऱ्या टोकाला अंबाती रायुडू साथ देत आहे. १२ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११४ अशी आहे.

GT vs CSK Live Score : ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक

चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड तुफानी फलंदाजी करत आहे. त्याने २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईने नऊ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड २५ चेंडूत ५६ धावा करून खेळत आहे. 

GT vs CSK Live Score : बेन स्टोक्स बाद 

राशिद खानने चेन्नई सुपर किंग्जला तिसरा धक्का दिला. आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने बेन स्टोक्सला बाद केले. सहा चेंडूंत सात धावा करून स्टोक्स यष्टिरक्षक वृद्धिमान साहाकरवी झेलबाद झाला. चेन्नईने ८ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड ३८ आणि अंबाती रायडू एका धावेवर खेळत आहेत.

GT vs CSK Live Score : पांड्याच्या षटकात ऋतुराजने ठोकले दोन षटकार 

ऋतुराज गायकवाडने १७ चेंडूत ३६ धावा केल्या आहेत. त्याने हार्दिक पांड्याच्या षटकात लागोपाठ दोन षटकार ठोकले. चेन्नईने ७ षटकांत २ गडी गमावून ६४ धावा केल्या आहेत. 

GT vs CSK Live Score : रशीद खानने मोईन अलीला बाद केले

रशीद खानने गुजरात टायटन्सला दुसरे यश मिळवून दिले. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने मोईन अलीला यष्टिरक्षक वृद्धिमान साहाकरवी झेलबाद केले. मोईनने १७ चेंडूत २३ धावा केल्या. चेन्नईच्या डावाचा पॉवरप्ले संपुष्टात आला आहे. त्यांनी ६ षटकांत दोन गडी बाद ५१ धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड २४ आणि बेन स्टोक्स एका धावेवर खेळत आहेत.

GT vs CSK Live Score : ५ षटकात ४६ धावा

चेन्नई सुपर किंग्जने ५ षटकांनंतर १ गडी गमावून ४६ धावा केल्या आहेत. मोईन अली १२ चेंडूत १९ धावा करून खेळत आहे. ऋतुराजने १३ चेंडूत २४ धावा केल्या आहेत. गुजरातसाठी शमीने पाचवे षटक टाकले. हे षटक खूप महागडे ठरले. शमीने पाचव्या षटकात एकूण १७ धावा दिल्या.

GT vs CSK Live Score : डेव्हॉन कॉन्वे बाद

चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बसला. कॉनवेला मोहम्मद शमीने क्लीन बोल्ड केले. कॉनवेला सहा चेंडूत केवळ एक धाव करता आली. यानंतर आता मोईन अली क्रीजवर आला. चेन्नईने तीन षटकात एका विकेटवर १४ धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड १२ धावांवर खेळत आहे.

GT vs CSK Live Score : चेन्नईची फलंदाजी सुरू

गुजरात टायटन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा डाव सुरू झाला आहे. सीएसकेचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे क्रीजवर उतरले आहेत. गुजरातसाठी मोहम्मद शमीने पहिले षटक टाकले.

GT vs CSK Live Score : दोन्ही संघ

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन) : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, केन विल्यमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवाटिया, रशीद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ

राखीव खेळाडू : बी साई सुधारसन, जयंत यादव, मोहित शर्मा, अभिनव मनोहर, केएस भरत

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगरगेकर

राखीव खेळाडू : तुषार देशपांडे, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद, अजिंक्य रहाणे, निशांत सिंधू

GT vs CSK Live Score : चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करेल

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंग धोनीचा संघ प्रथम फलंदाजी करेल.

GT vs CSK Live Score : थोड्याच वेळात टॉस

आयपीएलचा उद्घाटन सोहळा पार पडला. आता थोड्याच वेळात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाणेफेकसाठी मैदानात उतरतील.

WhatsApp channel