मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs GT : आरसीबी आयपीएलमधून बाहेर, शुभमनच्या शतकानं मुंबई प्लेऑफमध्ये

RCB vs GT : आरसीबी आयपीएलमधून बाहेर, शुभमनच्या शतकानं मुंबई प्लेऑफमध्ये

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 22, 2023 12:13 AM IST

RCB vs GT highlights : गुजरात टायटन्सने आयपीएलच्या एका रोमांचक सामन्यात आरसीबीचा ५ गडी राखून पराभव केला. या पराभवासह आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आरसीबीच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.

RCB vs GT highlights
RCB vs GT highlights

RCB vs GT highlights : आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे आरसीबीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. २१ मे (रविवार) रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीचा गुजरात टायटन्सने सहा गडी राखून पराभव केला. आरसीबीच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. गुजरातने ऋद्धिमान साहाची विकेट स्वस्तात गमावली. साहाला मोहम्मद सिराजने वेन पारनेलच्या हाती झेलबाद केले. येथून शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करत गुजरातला मजबूत स्थितीत आणले. शंकरने ३५ चेंडूंत ७ चौकार आणि दोन षटकारांसह ५३ धावा केल्या. शंकर बाद झाल्यानंतर गुजरातने दासून शनाका आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या.

आरसीबीचा डाव

पाऊस आणि ओले मैदान यामुळे सामना ५५ मिनिटे उशिरा सुरू झाला. मात्र, या विलंबाचा आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसवर कोणताही परिणाम झाला नाही. दोन्ही खेळाडूंनी मिळून ७.१ षटकात ६७ धावांची भागीदारी केली. नूर अहमदने डु प्लेसिसला बाद करून ही धोकादायक भागीदारी संपुष्टात आणली. कर्णधार डू प्लेसिसने १९ चेंडूंत २८ धावा केल्या, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता.

यानंतर रशीद खानच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलच्या (११ धावा) रूपाने आरसीबीने आपली दुसरी विकेट गमावली. त्यानंतर नूर अहमदने महिपाल लोमरोर (१ धाव) देखील बाद केले, ज्यामुळे आरसीबीची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ८५ धावा झाली. येथून, मायकेल ब्रेसवेल आणि विराट कोहली यांच्यात ४७ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे आरसीबीच्या डावाला गती मिळाली. ब्रेसवेल बाद झाला पण कोहली शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने शानदार शतक झळकावले.

विराट कोहलीने ६१ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०१ धावा केल्या. कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धही शतक (१०० धावा) केले होते. किंग कोहली आता आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. कोहलीने सहा शतके झळकावणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले.

WhatsApp channel