Team India fitness ahead of World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघ गेल्या काही महिन्यांपासून दुखापतींनी त्रस्त आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या अपघातामुळं संघाला धक्का बसलेला असतानाच दोन वेगवान गोलंदाज व दोन फलंदाज खेळताना जायबंदी झाले. त्यामुळं मागील काही मालिकांमध्ये टीम इंडियाला अनेक प्रयोग करावे लागले. आता विश्वचषकाच्या आधी संघासाठी गुडन्यूज आहे. पंत वगळता अन्य चार खेळाडू फिट झाले असून लवकरच मैदानात दिसणार आहेत.
जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे दोन वेगवान गोलंदाज आणि केएल राहुल व श्रेयस अय्यर हे दोन फलंदाज दुखापतींमुळे त्रस्त होते. बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) त्यांच्या दुखापतींवर उपचार सुरू होते. आता चारही खेळाडूंनी पुन्हा सराव सुरू केल्याचं वृत्त आहे. बुमराह आणि कृष्णा हे आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळणार आहेत. बुमराह तर या मालिकेचं कर्णधारपद भूषवणार आहे.
शस्त्रक्रियेनंतर मैदानात परतलेले दोन फलंदाज म्हणजे केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही आता जवळपास फिट आहेत. दोघांनीही नुकताच एनसीएमधील सराव सामन्यात भाग घेतला.
विश्वचषकासाठी संघ निवडण्याचं मोठं आव्हान निवड समितीसमोर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका गमावल्यामुळं निवड समितीला अनेक खेळाडूंबद्दल फेरविचार करावा लागाणार आहे. अशा वेळी चार खेळाडूंनी पुन्हा मैदानात उतरणं हे टीम इंडियासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे. या चार पैकी तीन खेळाडूंना विश्वचषकासाठी संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही संकेत दिले होते. दुखापतग्रस्त असलेले काही खेळाडू आशिया कपमध्ये खेळताना दिसतील, असं ते म्हणाले होते. ते खेळाडू कोण असतील हे निश्चित झालं नसलं तरी जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांना १७-१८ सदस्यीय संघात स्थान मिळू शकतं. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे एनसीए इथं होणाऱ्या आशिया चषकाच्या सराव शिबिरात दिसू शकतात, , असं बोललं जातंय.