राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत नेमबाजी, हॉकी आणि क्रिकेटमध्ये पदकं जिंकतो, पण आता यापुढे भारताला या खेळांमध्ये पदकं जिंकता येणार नाही. कारण कॉमनवेल्थ गेम्समधून या खेळांना काढून टाकण्यात आले आहे.
आगामी कॉमनवेल्थ गेम्स हे स्कॉटलँडच्या ग्लासगो येथे होणार आहेत. यजमान देशाने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी यांसारख्या प्रमुख खेळांना २०२६ च्या क्रीडा कार्यक्रमातून काढून टाकले आहे आणि त्यात फक्त १० खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
खर्च कमी करण्यासाठी टेबल टेनिस, स्क्वॅश आणि ट्रायथलॉन देखील वगळण्यात आले आहेत. बर्मिंगहॅम येथे २०२२ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये समाविष्ट ९ खेळ पुढील कॉमनवेल्थ गेम्सचा भाग असणार नाहीत.
आगामी कॉमनवेल्थ गेम्स हे २३ जुलै २०२६ पासून खेळले जाणार आहेत. हे गेम्स २ ऑगस्टपर्यंत चालतील. ग्लासगोने यापूर्वी २०१४ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते.
कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने (CGF) एका निवेदनात म्हटले आहे की, 'क्रीडा कार्यक्रमात ॲथलेटिक्स आणि पॅरा ॲथलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड), स्विमिंग आणि पॅरा स्विमिंग, जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो, बोल्स यांचा समावेश आहे. यासोबत एक स्टेटमेंट आणि पॅरा बाऊल्स, 3×3 बास्केटबॉल आणि 3×3 व्हीलचेअर बास्केटबॉल समाविष्ट केले आहेत असे कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने सांगितले.
निवेदनानुसार, 'हे खेळ स्कॉटटाउन स्टेडियम, टोलक्रॉस इंटरनॅशनल स्विमिंग सेंटर, एमिरेट्स अरेना आणि स्कॉटिश कॉम्पिटिशन कॉम्प्लेक्स (SEC) या चार ठिकाणी आयोजित केले जातील. खेळाडू आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफची हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येईल.
ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारताच्या पदकांच्या संभाव्यतेसाठी एक मोठा धक्का आहे, कारण याआधी त्यांनी काढून टाकलेल्या खेळांमध्ये भारताने बहुतेक पदके जिंकली होती. बर्मिंगहॅम गेम्समधून शूटिंग देखील काढून टाकण्यात आले होते आणि ते परत येण्याची फारशी शक्यता नाही.
खर्च कमी करण्यासाठी या खेळांना कमी करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. पण या खेळांना वगळणे हा भारतासाठी मोठा धक्का असेल. हॉकीत भारताच्या पुरुष संघाने ३ रौप्य आणि २ कांस्यपदके जिंकली आहेत, तर महिलांनी २००२ च्या खेळांमध्ये ऐतिहासिक सुवर्णासह ३ पदके जिंकली आहेत.
भारताने बॅडमिंटनमध्ये १० सुवर्णपदके जिंकली आहेत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या इतिहासात भारताने १० सुवर्ण, ८ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण ३१ पदके जिंकली आहेत. नेमबाजीत भारताने ६३ सुवर्ण, ४४ रौप्य आणि २८ कांस्य अशी एकूण १३५ पदके जिंकली आहेत.
कुस्ती स्पर्धेत देशाने ११४ पदके जिंकली असून त्यात ४९ सुवर्ण, ३९ रौप्य आणि २६ कांस्य पदके आहेत. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुन्हा क्रिकेटचा समावेश करण्यात आला ज्यामध्ये भारतीय महिला संघाने रौप्य पदक जिंकले.
संबंधित बातम्या