मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Gautam Gambhir: गंभीर-वीरुची जोडी पुन्हा मैदानात दिसणार, दोघंही ‘या’ स्पर्धेत खेळणार

Gautam Gambhir: गंभीर-वीरुची जोडी पुन्हा मैदानात दिसणार, दोघंही ‘या’ स्पर्धेत खेळणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 19, 2022 08:48 PM IST

Legends League Cricket: लिजेंड्स लीग क्रिकेट १७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या लीगमध्ये ख्रिस गेल, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, शेन वॉटसन, ब्रेट ली, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, मुथय्या मुरलीधरन आणि जॅक कॅलिस सारखे प्रतिष्ठित खेळाडू दिसणार आहेत.

gautam gambhir and virender sehwag
gautam gambhir and virender sehwag

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर तब्बल अनेक वर्षांनंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. गंभीरने लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्यास होकार दिला आहे. २००७ T20 विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा गंभीर या लीगमध्ये वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण या माजी सहकाऱ्यांसोबत खेळताना दिसणार आहे.

गौतम गंभीर याने स्वत: ही माहिती दिली आहे. तो म्हणाला, “मला हे सांगताना आनंद होत आहे की १७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये मी सहभागी होण्यासाठी होकार दिला आहे. मी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परत येण्यास उत्सुक आहे. जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंसोबत पुन्हा खेळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे".

सीईओ रमण रहेजा यांच्याकडून गंभीरच्या निर्णयाचे स्वागत

तसेच, लिजेंड्स लीग क्रिकेटचे सीईओ रमण रहेजा यांनी गंभीरच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी ते म्हणाले की,  “क्रिकेट मैदानावरील गंभीरचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. देशाला विश्वचषक जिंकवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. गौतमच्या आगमनाने लिजेंड्स लीग क्रिकेटचा अनुभव आणखी चांगला होणार आहे”.

दरम्यान, लिजेंड्स लीग क्रिकेट १७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गंभीरने २००३ मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याने आपल्या कारकिर्दितला शेवटचा सामना २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. 

गंभीरचे करिअर

गंभीरने ५८ कसोटीत ४१.९५ च्या सरासरीने ४१५४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ९ शतके आणि २२ अर्धशतके आली आहेत. तसेच, १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३९.६८ च्या सरासरीने ५२३८ धावा केल्या आहेत. यादरम्यान तो ११ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरला. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, गंभीरने ३७ सामन्यांमध्ये ९३२ धावा केल्या. त्याने ७ अर्धशतकेही झळकावली.

दिग्गज खेळाडूंचा समावेश

या लीगमध्ये ख्रिस गेल, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, शेन वॉटसन, ब्रेट ली, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, मुथय्या मुरलीधरन आणि जॅक कॅलिस सारखे प्रतिष्ठित खेळाडू दिसणार आहेत.  लिजेंड्स लीग क्रिकेटचा आगामी सीझन कोलकाता, नवी दिल्ली, कटक, लखनौ, जोधपूर आणि राजकोट या सहा भारतीय शहरांमध्ये खेळवला जाणार आहे.

 

 

 

WhatsApp channel