मराठी बातम्या  /  क्रीडा  /  इंडियन्स काहीही करु शकतात! ‘हे’ कसं शक्य आहे?

इंडियन्स काहीही करु शकतात! ‘हे’ कसं शक्य आहे?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 26, 2022 05:07 PM IST

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला एक टेस्ट मॅच, तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ लीसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळत आहे.

indian cricket fans
indian cricket fans

भारतीय चाहत्यांना जितके क्रिकेटचे वेड आहे, तेवढे तुम्हाला दुसरे कोणत्याच देशात पाहायला मिळणार नाही. भारतीय क्रिकेट चाहते क्रिकेटसाठी काहीही करु शकतात. अशाच पद्धतीने टीम इंडियाच्या चाहत्यांनी तीन दिवसात एका छोट्याशा YouTube चॅनलला स्टार बनवले आहे.

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला एक टेस्ट मॅच, तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ लीसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळत आहे. या सराव सामन्याच्या पहिल्या तीन दिवसातच लीसेस्टरशायर क्रिकेट क्लबच्या YouTube चॅनेलने गगन भरारी घेतली आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ज्या यूट्यूब चॅनलचे सराव सामन्यापूर्वी ५० हजारही सबस्क्राइबर्स नव्हते, आज त्या चॅनलचे १.५ लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स झाले आहेत. हा चमत्कार दुसरे तिसरे कोणी केला नसून टीम इंडियाच्या चाहत्यांची ही करामत आहे. ज्यांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही मैदानावर आपल्या खेळाडूंना पाहायला आवडते.

यापूर्वी लीसेस्टर संघाच्या या यूट्यूब चॅनलवर ८८५ हून अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते, परंतु क्वचितच एखाद्या व्हिडिओला एक लाख व्ह्यूज मिळायचे. पण टीम इंडियाच्या सराव सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ५ मिलियन व्ह्यूजवर पोहोचले आहे. पहिल्या दिवशी ४.६ दशलक्ष, दुस-या दिवशी ३.७ दशलक्ष आणि तिसर्‍या दिवशी ५ दशलक्ष व्ह्यूजची नोंद केली गेली. यामुळे या यूट्यूब चॅनलने नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा हा सराव सामना सुरू झाला नव्हता (२१ जून २०२२), तोपर्यंत Foxes TV च्या सबस्क्राईबर्सची संख्या ४७ हजारांच्या आसपास होती, पण २६ जून २०२२ नंतर या YouTube चॅनेलच्या सबस्क्राईबर्सची संख्या १ लाख ९५ हजारांच्या पुढे गेली आहे. यावरून भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये क्रिकेट सामना पाहण्याची क्रेझ दिसून येते, ज्यांनी एका छोट्याशा YouTube चॅनेलला काही दिवसांत स्टार बनवले आहे.

WhatsApp channel