मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni: भारतीय खेळाडू सचिनला नाही तर धोनीला फॉलो करतात, दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

MS Dhoni: भारतीय खेळाडू सचिनला नाही तर धोनीला फॉलो करतात, दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 01, 2022 10:30 PM IST

Rashid Latif on indian cricket team: सूर्यकुमार यादवच्या आक्रमक खेळीचे जगभरातून कौतुक होत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही त्याचे खूप कौतुक करत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफही सूर्यकुमारचा चाहता झाला आहे. भारतीय खेळाडू आता सचिन तेंडुलकरला नाही तर महेंद्रसिंग धोनीला फॉलो करत असल्याचे लतीफने म्हटले आहे.

sachin and dhoni
sachin and dhoni

आशिया कपम स्पर्धेत भारतीय संघ सुपर-४ मध्ये पोहोचला आहे. बुधवारी टीम इंडियाने आपल्या शेवटच्या ग्रुप सामन्यात हाँगकाँगचा पराभव करून पुढील फेरीसाठी पात्रता मिळवली. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमारने २६ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. आता भारतीय संघ रविवारी पाकिस्तान आणि हाँगकाँग सामन्यातील विजेत्या संघाशी भिडणार आहे.

सूर्यकुमारच्या आक्रमक खेळीचे जगभरातून कौतुक होत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही त्याचे खूप कौतुक करत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफही सूर्यकुमारचा चाहता झाला आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याने भारतीय फलंदाजांबद्दल मोठे विधान केले आहे. भारतीय खेळाडू आता सचिन तेंडुलकरला नाही तर महेंद्रसिंग धोनीला फॉलो करत असल्याचं लतीफने म्हटले आहे.

रशीद लतीफ म्हणाला की, “टी-२० आल्यापासून खेळ बदलला आहे. एक काळ असा होता जेव्हा खेळाडू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंना फॉलो करायचे. मात्र, आता तशी स्थिती राहिलेली नाही. भारतीय संघात असे तीन-चार खेळाडू आहेत जे आता या खेळाडूंना फॉलो करत नाहीत. ते या खेळाडूंचा आदर करतात, पण ते धोनीला फॉलो करतात. हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि अगदी दीपक हुडाही धोनीप्रमाणेच खेळतात. जर हे खेळाडू तीन चेंडू डॉट खेळत असतील, तर पुढच्या तीन चेंडूत तीन षटकार मारून ते सर्व बरोबर करतात”.

सोबतच लतीफ पुढे म्हणाला की, “युवा खेळाडू सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्यापासून पुढे गेले आहेत. त्यांना धोनीसारखे खेळायचे आहे. धोनी ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतो आणि ज्या पद्धतीने आपली इनिंग बनवतो, बाकीच्या खेळाडूंनाही तसेच, करायचे आहे. भारताचे टॉप-३ फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत, पण मधल्या फळीतील भारतीय फलंदाज फॉर्मात आहेत. सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळत नसली तरी कोणत्याही क्रमांकावर चांगली कामगिरी करण्याची क्षमता त्याच्यात आहे”, असे राशीद लतीफने म्हटले आहे.

आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव केला. अ गटातून सुपर-४ साठी पात्र ठरणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला आहे. आता पाकिस्तानचा संघ शुक्रवारी हाँगकाँगशी भिडणार आहे. या दोघांपैकी विजेता संघ सुपर-४ मध्ये प्रवेश करेल. त्याचबरोबर अफगाणिस्तानने ग्रुप-बी मधून सुपर-४ साठी पात्रता मिळवली आहे.

 

WhatsApp channel