
फिफा वर्ल्डकपचा थरार संपला आहे. या स्पर्धेचे विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकले. त्यानंतर फायनलमधील दोन्ही संघ आपापल्या मायदेशी परतले आहेत. वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिनाचे त्यांच्या मायदेशी जंगी स्वागत करण्यात आले. पहाटे ३ च्या सुमारास पोहोचलेल्या संघाचे स्वागत करण्यासाठी हजारो लोक विमानतळावर हजर होते.
तसेच, उपविजेता फ्रान्स संघाचेही त्यांच्या मायदेशी जोरदार स्वागत करण्यात आले. फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतरही फ्रेंच संघ मायदेशी पोहोचला तेव्हा मध्य पॅरिसमध्ये हजारो समर्थकांनी त्यांचे चॅम्पियन्ससारखेच स्वागत केले. किलियन एम्बाप्पे आणि त्याचे सहकारी स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता दोहाहून चार्ल्स डी गॉल विमानतळावर उतरले. खेळाडू निराशेत विमानातून बाहेर आले पण विमानतळ कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत 'धन्यवाद' आणि 'पॅरिस लव्ह्स यू' असे बोर्ड दाखवून केले.
मात्र, फ्रान्सच्या संघाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. अंतिम फेरीत अर्जेंटिनाकडून फायनल हारल्याने खेळाडूंच्या चेहऱ्यावरील दुःख साफ दिसत होते. ते विमानतळावरून बसने प्लेस दे ला कॉनकॉर्ड येथे पोहोचले. त्या ठिकाणी हजारो समर्थक त्यांची वाट पाहत होते. समर्थकांचा उत्साह पाहून संघाचाही उत्साह परतला.
याउलट, २०१८ मध्ये विजेतेपद जिंकून फ्रान्स परतला होता. तेव्हा चॅम्प्स-एलिसेसमध्ये संघाची अशी कोणतीही परेड झाली नव्हती. मात्र, यावेळी थंडीची संध्याकाळ असतानाही चाहते संघाचे स्वागत करण्यासाठी आले होते.
संघाचे कोच डिडे डिशॅम्स आणि किलियन एम्बाप्पे बाल्कनीत आले तेव्हा समर्थकांनी झेंडे फडकावत ला मार्सिलाइज’ गात त्यांचे स्वागत केले.
एम्बाप्पेने अंतिम सामन्यात जीव आणला
दरम्यान, अर्जेंटिना वर्ल्डकप जिंकला असेल, पण विश्वचषकात हॅट्ट्रिकसह एकूण ४ गोल करणाऱ्या फ्रेंच स्टार किलियन एमबाप्पेचीही जगभरात प्रचंड चर्चा होत आहे.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात किलियन एमबाप्पेने ऐतिहासिक हॅटट्रिक केली. सामन्याच्या ८० व्या मिनिटाला अर्जेंटिना २-० ने आघाडीवर होता. त्यावेळी अर्जेंटिना एकतर्फी सामना जिंकेल असे वाटत असतानाच एम्बाप्पेने चमत्कार केला. त्याने अशी चपळता दाखवली की संपूर्ण जग थक्क झाले होते.
संबंधित बातम्या
