
ब्राझीलचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर नेमारला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. सामन्यानंतर तो लहान मुलासारखा ढसाढसा रडताना दिसला.
नेमार खूपच निराश दिसत होता. क्रोएशियाचे खेळाडू जल्लोषाने सैरावैरा पळत असताना नेमार आणि ब्राझीलचे इतर खेळाडून निराशेने मैदानावरर बसलेले दिसले. हे दृष्य खूपच ह्रदयद्रावक होते. सोशल मीडियावर नेमारचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
सामन्यानंतर बोलताना नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. भावूक झालेला नेमार म्हणाला की, "मी राष्ट्रीय संघाचे दरवाजे बंद करत नाही, पण मी परत येईन याची १०० टक्के हमीही देऊ शकत नाही."
नेमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत सस्पेन्स असला तरी देशांतर्गत कारकिर्दीबाबत त्याची मानसिकता स्पष्ट आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर फ्रान्सची सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा लीग 1 पुन्हा सुरू होईल तेव्हा तो PSG साठी पुन्हा अॅक्शनमध्ये परतेल. लिओनेल मेस्सीही पीएसजीकडून खेळतो.
क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात नेमारने एक गोल केला. मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अतिरिक्त वेळेच्या पहिल्या हाफमध्ये नेमारने हा गोल केला, त्यामुळे ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळाली. पण क्रोएशियाने दुसऱ्या हाफमध्ये गोल करून सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. तिथे ब्राझीलचा पराभव झाला.
नेमारने २०१० मध्ये ब्राझीलच्या वरिष्ठ संघासाठी पदार्पण केले होते. परंतु आजपर्यंत त्याला विश्वचषक जिंकता आलेला नाही. नेमारने सामन्यादरम्यान ब्राझीलसाठी एक गोल केला. यासह त्याने आपल्याच देशाच्या खेळाडूची बरोबरी केली. नेमारने पेले यांच्या ७७ आंतरराष्ट्रीय गोलांची बरोबरी केली आहे. ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत दोघेजण आता संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत.
याआधीच्या २०१८ वर्ल्डकपमध्येही ब्राझीलचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला होता. त्यावेळी त्यांना बेल्जियमकडून २-१ ने पराभव पत्करावा लागला. त्याच वेळी, २०१४ मध्ये जर्मनीने सेमी फायनलमध्ये त्यांचा ७-१ ने पराभव केला. दरम्यान, दुखापतीमुळे नेमार त्या सामन्यात खेळला नव्हता.




