मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Indian Football: भारतीय फुटबॉलबद्दल 'या' रंजक गोष्टी माहीत आहेत का? जाणून घ्या

Indian Football: भारतीय फुटबॉलबद्दल 'या' रंजक गोष्टी माहीत आहेत का? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 17, 2022 12:39 PM IST

Indian Football: FIFA ने भारतीय फुटबॉलची प्रशासकीय संस्था AIFF वर बंदी घातली आहे. फिफाचे हे पाऊल भारतीय चाहते आणि खेळाडूंसाठी मोठा धक्का आहे.

Indian Football
Indian Football

भारतीय फुटबॉलसाठी १६ ऑगस्ट हा दिवस अत्यंत वाईट ठरला. जागतिक फुटबॉलची सर्वोच्च प्रशासकीय संस्था फिफाने मंगळवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) निलंबित केले आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंडर-१७ महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतले. ८५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच FIFA ने AIFF वर बंदी घातली आहे.

फिफाच्या या निर्णयामुळे भारतीय चाहते आणि खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. फिफाच्या बंदीमुळे पुढील वर्षी होणाऱ्या AFC आशियाई चषक स्पर्धेच्या भारतीय फुटबॉल संघाच्या तयारीवरही परिणाम होऊ शकतो. भारतीय फुटबॉलचा प्रवास हा चढ-उतारांचा राहिला आहे. एकेकाळी भारतीय संघाचा जागतिक फुटबॉलमध्ये बोलबोला होता पण आता भारतीय फुटबॉल संघ संघर्षाच्या काळातून जात आहे.

१) अखिल भारतीय फुटबॉल संघटनेची स्थापना २३ जून १९३७ रोजी शिमला येथे झाली. लष्कराच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला सहा प्रादेशिक फुटबॉल संघटनांची उपस्थिती होती. या सहा फुटबॉल संघटनांमध्ये IFA, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर आर्मी स्पोर्ट्स, युनायटेड प्रोव्हिन्स, नॉर्थ-वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशन, बिहार फुटबॉल असोसिएशन आणि दिल्ली सॉकर असोसिएशन यांचा समावेश होता.

२) सुनील छेत्री हा भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू आहे. सुनील छेत्रीने भारतासाठी १२९ सामन्यांत ८४ गोल केले आहेत. सक्रिय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओन मेस्सी यांनीच छेत्रीपेक्षा जास्त गोल केले आहेत.

३) भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय हा ऑस्ट्रेलिया आणि कंबोडियाविरुद्ध नोंदवला आहे. १९५६ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ७-१ असा पराभव केला होता. तर २००७ मध्ये भारताने कंबोडियाचा ६-० असा पराभव केला होता.

४) जागतिक फुटबॉल रँकिंगमध्ये भारत सध्या १०४ क्रमांकावर आहे. तर भारताची सर्वोत्तम रॅंकिंग ही ९४ होती, जी भारताने १९९६ मध्ये कमावली होती. त्याचवेळी सर्वात कमी रॅंकिंग ही १७३ होती. जी २०१५ मध्ये मिळाली होती.

५) भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. १९५१ (नवी दिल्ली) आणि १९६२ (जकार्ता) या  खेळांमध्ये भारताने हे स्थान मिळवले. याशिवाय १९७० च्या एशियन गेम्समध्ये भारताने कांस्यपदक जिंकले होते.

६) भारतीय फुटबॉल संघाने ४ वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आहे. यादरम्यान, भारताची सर्वोत्तम कामगिरी १९५६ मधील मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये होती. त्या स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकाच्या लढतीत बल्गेरियाकडून पराभव पत्करावा लागल्याने चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

७) भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंत एकाही विश्वचषकात भाग घेतलेला नाही. १९५० च्या विश्वचषकासाठी भारत पात्र ठरला होता. पण प्रवासाचा खर्च, सरावाचा वेळ आणि ऑलिम्पिक खेळांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.  

दरम्यान, फिफाने खेळाडूंना अनवाणी खेळण्यास बंदी घातली होती. त्यामुळे भारताने विश्वचषकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, असेही इतिहासकार आणि फुटबॉल तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

८) भारतीय फुटबॉल संघाच्या महान खेळाडूंमध्ये पीके बॅनर्जी, चुन्नी गोस्वामी, तुलसीदास बलराम, आयएम विजयन, बायचुंग भुतिया आणि सुनील छेत्री यांच्या नावांचा समावेश आहे. त्याच वेळी, डॉ. तालीमेरेन एओ हे भारतीय संघाचे पहिले कर्णधार होते. १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रान्सविरुद्ध भारताचे नेतृत्व केले होते.

९) मोहन बागान आणि डेम्पो हे भारतातील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहेत, ज्यांनी प्रत्येकी ५ वेळा चॅम्पियनशिप जिंकली आहे. मोहन बागानने तीनदा NFL आणि दोनदा आय-लीग जिंकली आहे. डेम्पोने दोनदा एनएफएल आणि तीनदा आय-लीगवर कब्जा केला. याशिवाय, बेंगळुरू हा एकमेव क्लब आहे, ज्याने किमान एकदा आय-लीग आणि इंडियन सुपर लीग जिंकली आहे.

10) . भारतीय संघ ५ वेळा एएफसी आशियाई कपसाठी पात्र ठरला आहे. या दरम्यान, भारताची सर्वोत्तम कामगिरी १९६४ च्या स्पर्धेत होती. त्या स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता ठरला होता. त्या मोसमात इंदर सिंगने भारतासाठी सर्वाधिक २ गोल केले होते.

 

 

WhatsApp channel