मराठी बातम्या  /  क्रीडा  /  गोलंदाजीत नाही तर फलंदाजीत टीम साऊथीची कमाल, सचिन-डिव्हिलियर्सला मागे टाकले

गोलंदाजीत नाही तर फलंदाजीत टीम साऊथीची कमाल, सचिन-डिव्हिलियर्सला मागे टाकले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 27, 2022 06:01 PM IST

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंड कसोटी संघाचा विद्यमान प्रशिक्षक आणि माजी किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०७ षटकार ठोकले आहेत.

tim southee
tim southee

इंग्लंड आणि न्यूझीलंड (england vs newzeland) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी (test cricket) मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे सुरू आहे. न्यूझीलंडने इंग्लंडसमोर २९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात मैदानात उतरला असून सामन्यावर त्यांची पकड मजबूत मानली जात आहे.

आज शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या २ बाद १८३ धावा झाल्या आहेत. पावसामुळे खेळ थांबला आहे. इंग्लंडला विजयासाठी आणखी ११३ धावांची आवश्यकता आहे. जो रुट ५५ आणि ओली पोप ८१ धावांवर खेळत आहेत.

दरम्यान, या सामन्यात न्युझीलंडचा अनुभवी गोलंदाज टीम साऊथीने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे त्याने हा खास विक्रम गोलंदाजीत नाही तर फलंदाजीत केला आहे. टीम साऊथीने कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि ए बी डिव्हीलियर्स यांसारख्या फलंदाजांना मागे टाकले आहे आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात साऊथीने संघासाठी महत्वपूर्ण ३३ धावांची खेळी केली. त्याने २९ चेंडूत ५ चौकार आणि एक षटकार लगावला. याचबरोबर त्याच्या कसोटीत क्रिकेटमधील षटकारांचा आकडा ७६ वर पोहोचला आहे. त्याचा हा षटकारांचा आकडा सचिन, डिव्हिलियर्स आणि रिकी पॉंटिंग या कसोटी क्रिकेटमधील अनेक दिग्गज फलंदाजांपेक्षाही जास्त आहे.

साऊदीने ८८ कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार ८५५ धावा केल्या आहेत. यात १८७ चौकार आणि ७६ षटकारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांमध्ये ६९ षटकार मारले आहेत. रिकी पॉटिंगने ७३ तर डिव्हिलियर्सने कसोटी क्रिकेटमध्ये ६४ षटकार मारले आहेत.

कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप ५ फलंदाज-

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंड कसोटी संघाचा विद्यमान प्रशिक्षक आणि माजी किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०७ षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर ९६ कसोटी सामन्यांमध्ये १०० षटकार आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ९६ कसोटी सामन्यांमध्ये १०० षटकार ठोकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टनेही ९६ कसोटींमध्येच हा पराक्रम केला होता.

याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने ९८ तर दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू जॅक कॅलिसने ९७ षटकार ठोकले आहेत. अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या टॉप पाच खेळाडूंच्या यादीत बेन स्टोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, अॅडम गिलख्रिस्ट, ख्रिस गेल आणि जॅक कॅलिस यांचा समावेश आहे.

WhatsApp channel