एकीकडे अफगाणिस्तानात तालिबान महिलांवर अनेक निर्बंध लादत आहे, अनेक देशांमध्ये महिलांच्या प्रत्येक मुद्द्यांवर फतवे काढले जात आहेत, तर दुसरीकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इजिप्तच्या एका महिला फेन्सरने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील तलवारबाजी स्पर्धेत भाग घेतल्यानंतर इजिप्शियन तलवारबाज नादा हाफेझने ती ७ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड केले आहे. तालिबानने तर महिलांवर क्रिकेट खेळण्यावरही बंदी घातली आहे. सर्व निर्बंधांमुळे महिलांना मोकळा श्वासही घेता येत नाही.
पण आता इजिप्तच्या नादा हाफेझ या २६ वर्षीय खेळाडूला अख्खं जग सलाम ठोकत आहे. नादा हाफेज पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या तलवारबाजी स्पर्धेत राउंड ऑफ १६ पर्यंत पोहोचली होती. पण या फेरीत तिचा पराभव झाला.
महिलांच्या सेबर इव्हेंटमध्ये राऊंड ऑफ १६ मध्ये पोहोचल्यानंतर काही तासांनी, नादा हाफेजने तिच्या 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केले की तिच्या पोटात 'छोटा ऑलिम्पियन' वाढत आहे.
कैरोच्या २६ वर्षीय तलवारबाज खेळाडूने अमेरिकेच्या एलिझाबेथ टार्टाकोव्स्कीला पराभूत करून खळबळ उडवून दिली होती. परंतु नंतर कोरियाच्या जिओन हेंगकडून नादा हाफेजला पराभव पत्करावा लागला.
हाफेजने इन्स्टावर लिहिले, की 'माझ्या बाळाने आणि मी अनेक आव्हानांचा सामना केला, मग ते शारीरिक असो वा भावनिक.
ती म्हणाली, गर्भधारणा हा एक कठीण प्रवास आहे, परंतु जीवन आणि खेळ यांच्यात संतुलन राखण्यासाठी संघर्ष करणे खूप कठीण होते. राउंड ऑफ १६ च्या फेरीत माझे स्थान निश्चित केल्यानंतर मला अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी मी ही पोस्ट लिहित आहे.
नादा हाफेज मेडीकल सायन्सची पदवी आहे. ती माजी जिम्नॅस्ट आणि तीन वेळा ऑलिम्पियन आहे. तिने २०१९ आफ्रिकन गेम्समध्ये वैयक्तिक आणि सांघिक सेबर स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
नादा हाफेजच्या या पोस्टमुळे सर्वांना साऊथ सुपरस्टार यशच्या KGF या सुपरहिट चित्रपटातील एका डायलॉगची आठवण झाली. ज्यात ऐतिहासिक ओळ म्हटली गेली आहे, “आई जगातील सर्वात महान योद्धा असते”.