MLC 2023 : नॉर्कियाच्या बाऊन्सरवर ब्राव्होचा गगनचुंबी षटकार; पाहा व्हायरल व्हिडिओ-dwayne bravo hits towering six over anrich nortjes bouncer in major league cricket 2023 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MLC 2023 : नॉर्कियाच्या बाऊन्सरवर ब्राव्होचा गगनचुंबी षटकार; पाहा व्हायरल व्हिडिओ

MLC 2023 : नॉर्कियाच्या बाऊन्सरवर ब्राव्होचा गगनचुंबी षटकार; पाहा व्हायरल व्हिडिओ

Jul 17, 2023 11:48 AM IST

Dwayne Bravo Sixes In MLC 2023 Viral Video : अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेटमधील सामन्यात ड्वेन ब्राव्होने वादळी खेळी केली. त्यात त्याने स्पर्धेतील सर्वात लांब षटकार देखील मारला आहे.

Dwayne Bravo High Six In Major League Cricket
Dwayne Bravo High Six In Major League Cricket (HT)

Dwayne Bravo High Six In Major League Cricket : मिनी आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत आहे. टेक्सास सुपर किंग्ज आणि वॉशिंग्टन फ्रीडम या संघात झालेल्या सामन्यात टीएसकेच्या ड्वेन ब्राव्होने जोरदार फटकेबाजी केली आहे. ब्राव्होने केवळ ३९ चेंडूत ७९ धावांची खेळी करत टी-ट्वेंटीतील बादशहा आपणच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. परंतु या खेळीत ब्राव्होने जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांच्या यादीत समावेश असलेल्या एनरिच नॉर्कियाच्या बाऊन्सरवर मारलेल्या गगनचुंबी षटकाराची चांगलीच चर्चा रंगली आहे. एमएलसीने या षटकाराचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामुळं अनेकांनी ब्राव्होचं कौतुक केलं आहे.

मेजर लीग क्रिकेटमध्ये झालेल्या सामन्यात पहिल्यांदाच फलंदाजी करताना वॉशिंग्टन फ्रीडम संघाने २० षटकांत १६३ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टेक्सास सुपर किंग्जची सुरुवात काही चांगली झाली नाही. केवळ ५० धावांवर निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर ड्वेन ब्राव्हो फलंदाजीसाठी आला. खेळीची सावध सुरुवात करताना ब्राव्होने पहिल्या १६ चेंडूत केवळ ९ धावा केल्या. त्यानंतर त्याने गिअर बदलत वॉशिंग्टन संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई सुरू केली. अखेरच्या तीन षटकांत टीएसकेला विजयासाठी ५६ धावांची गरज असतानाच वॉशिंग्टनकडून नॉर्किया गोलंदाजीसाठी आला.

नॉर्कियाच्या १८ व्या षटकात ड्वेन ब्राव्होने तब्बल १७ धावा वसूल केल्या. त्यात त्याने नॉर्कियाच्या एका बाऊन्सरवर तब्बल १०६ मीटरचा उत्तुंग षटकार मारला. एमएलसी स्पर्धेतील हा आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठरला आहे. ब्राव्होच्या वादळी खेळीनंतरही टेक्सास संघाचा सहा धावांनी पराभव झाला आहे. परंतु या सामन्यात ब्राव्होने नॉर्कियाला मारलेल्या गगनचुंबी षटकाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. अनेकांनी ब्राव्होचं कौतुक केलं असून तोच टी-ट्वेंटीचा खरा किंग असल्याचं म्हटलं आहे.

Whats_app_banner