महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना (२ फेब्रुवारी) अहिल्यानंतर येथे पार पडला. या सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. पृथ्वीराज मोहोळ हा ६७वा महाराष्ट्र केसरी ठरला.
पण या सामन्यापूर्वी चांगलाच राडा झाला. सेमी फायनल सामन्यात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केली. वास्तिवक, सेमी फायनलचा सामना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. यात मोहोळने बाजी मारली. पण या सामन्यात पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचे शिवराज राक्षे याचे म्हणणे होते. यावरून हा राडा झाला. यावेळी शिवराजने पंचांची कॉलर ओढली आणि त्यांना लाथही मारली.
आता या वादावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली यावर बोलताना, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले, की पृथ्वीराज मोहोळ याचे अभिनंदन, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त होता. शिवराज राक्षेने खरं तर पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत.
कारण मी देखील २००९ मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना अशाच वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो. शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो. मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि ६ मिनिटांची कुस्ती दीड तास सुरु ठेवल्यामुळे माझा पराभव झाला. मी जो अन्याय सहन केला होता, तोच अन्याय आज शिवराजला सहन करावा लागला."
गादी विभागातील सेमीफायनलचा सामना पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झाला. या सामन्याला सुरुवात होताच १ मिनिटाच्या आत पंचांनी कुस्ती झाल्याचा निर्णय दिला. मात्र शिवराजच्या मते त्याची पाठ खाली टेकली नव्हती. त्याने रिप्लेची मागणी केली होती. मात्र रिप्ले न मिळाल्याने त्याने संतापाच्या भरात पंचांची कॉलर ओढली आणि लाथ मारली.
संबंधित बातम्या