मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टी-वर्ल्डकपसाठी फिनिशर कोण? कार्तिक, तेवतिया अन् हार्दिक पांड्या यांच्यात चुरस

टी-वर्ल्डकपसाठी फिनिशर कोण? कार्तिक, तेवतिया अन् हार्दिक पांड्या यांच्यात चुरस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 13, 2022 08:45 PM IST

टी-२० वर्ल्डकपला अवघे चार महिनेच उरले आहेत. त्यामुळे निवड समितीला लवकरच टी-२० वर्ल्डकपसाठीच्या संघ निवडीबाबत योग्य पावलं उचलावी लागणार आहेत.

टी-वर्ल्डकपसाठी फिनिशर कोण?
टी-वर्ल्डकपसाठी फिनिशर कोण?

आधुनिक क्रिकेटमध्ये फिनीशरच्या रोलचे महत्व दिवसेंदिवस वाढतच जात आहे. टीम इंडियाला सुद्धा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी अशा फिनीशरची गरज भासणार आहे, जो पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके खेळू शकतो. टी-२० वर्ल्डकपला अवघे चार महिनेच उरले आहेत. त्यामुळे निवड समितीला लवकरच टी-२० वर्ल्डकपसाठीच्या संघ निवडीबाबत योग्य पावलं उचलावी लागणार आहेत. 

दरम्यान, आयपीएलनंतर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातच ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्या मालिकेसाठी पांड्या, कार्तिक आणि तेवतिया यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

यंदाचे आयपीएल (IPL) सीझन हे येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. या सीझनमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा वर्ल्डकपचा संघ निवडताना निवड समिती नक्कीच विचार करु शकते. यंदाच्या आयपीएल मोसमात हार्दीक पांड्या, दिनेश कार्तिक आणि राहुल तेवटिया यांनी आपापल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. 

दिपक हुड्डा आणि व्यंकटेश अय्यर ठरले अपयशी-

हार्दीक पांड्या फिटनेसच्या समस्येमुळे गेले वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे टीम इंडियात व्यंकटेश अय्यर आणि दिपक हुड्डा यांना संघात संधी देण्यात आली. मात्र, हे दोघेही आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करण्यात सपशेल अपयशी ठरले. तसेच, यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दीक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचे टीम इंडियात पुनरागमन होण्याची शक्यता जास्त आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने आतापर्यंत ११ डावांमध्ये १३०.८० च्या स्ट्राईक रेटने ३४४ धावा केल्या आहेत. 

तेवतिया, कार्तिकने उचलला आयपीएलचा पुरेपूर फायदा

यंदाच्या आयपीएलमध्ये राहुल तेवटीया आणि दिनेश कार्तिक या दोघांनी आपापल्या संघासाठी फिनिशरचा रोल निभावला आहे. दोघांनीही यंदाच्या आयपीएलचा पूरेपूर फायदा उचलला आहे. कार्तिक अन् तेवतिया यांनी आपल्या फलंदाजीच्या बळावर अशक्य वाटणारे विजय हे संघाला मिळवून दिले आहेत. तेवटीयाचा संघ गुणतालिकेत क्रमांक एकवर तर कार्तिकचा संघ चौथ्या स्थानी आहे.

दिनेश कार्तिकने स्पर्धेतील १२ डावांमध्ये तब्बल २०० च्या स्ट्राईक रेटने २७४ धावा कुटल्या आहेत. तर तेवटीय १२ डावांत १४९. ३० च्या स्ट्राईक रेटने २१५ धावा चोपल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग