मराठी बातम्या  /  क्रीडा  /  दिनेश कार्तिक पहिल्यांदाच टीम इंडियाच्या कर्णधारपदी, दिली भावूक प्रतिक्रिया

दिनेश कार्तिक पहिल्यांदाच टीम इंडियाच्या कर्णधारपदी, दिली भावूक प्रतिक्रिया

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 02, 2022 11:04 PM IST

टीम इंडिया आणि डर्बीशायर यांच्यात टी-२० सराव सामना खेळवण्यात आला. यामध्ये भारतीय संघाने ७ गड्यांनी विजय मिळवला. या सामन्यासाठी दिनेश कार्तिककडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.

dinesh karthik
dinesh karthik (twitter, dinesh karthik)

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यानंतर वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या टी-२० मालिकेपूर्वी शुक्रवारी टीम इंडिया आणि डर्बीशायर यांच्यात टी-२० सराव सामना खेळवण्यात आला. यामध्ये भारतीय संघाने ७ गड्यांनी विजय मिळवला.

विशेष म्हणजे, या सामन्यासाठी दिनेश कार्तिककडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. कार्तिकने प्रथमच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे, यानंतर त्याने भावूक प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यावेळी दोन खास फोटोही ट्वीट केले आहेत.

विकेटकीपर फलंदाज कार्तिकने ट्वीट करत म्हटले आहे की, “'मी संघात बऱ्याच काळापासून भारतीय संघात आहे. मात्र पहिल्यांदाच मी या निळ्या जर्सीच्या संघाचे नेतृत्व केले. हा सराव सामना असला तरी माझ्यासाठी विशेष आणि मोठा सन्मान आहे. मला सदैव साथ दिल्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे खूप खूप आभार. या संघाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे".

डर्बी येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात डर्बीशायरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १५० धावा केल्या होत्या. डर्बीशायरकडून मॅडसेनने २३ चेंडूत २८ धावा केल्या. तर भारताकडून अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी चांगली गोलंदाजी करताना प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्यंकटेश अय्यर आणि अक्षर पटेल यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात भारताने १६.४ षटकांत हे आव्हान गाठले. भारताकडून दीपक हुडाने ५९ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव ३६ धावांवर नाबाद राहिला.

WhatsApp channel