Dinesh Karthik Birthday : डिप्रेशनमध्ये गेलेल्या कार्तिकला अभिषेक नायर आणि दीपिकानं वाचवलं, डीकेची कमबॅक स्टोरी!
dinesh karthik birthday : एकेकाळी महेंद्रसिंग धोनीसोबत विकेट कीपिंग करणाऱ्या दिनेश कार्तिकची कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात आल्याचे दिसत होते. २०१२ मध्ये दिनेश कार्तिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला.
dinesh karthik comeback story : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आज (१ जून) ३८ वर्षांचा झाला. १९८५ मध्ये जन्मलेल्या दिनेश कार्तिकचे क्रिकेट करिअर अनेक चढ-उतारांचे राहिले आहे. दिनेश कार्तिकही एकदा प्रचंड डिप्रेशनचा बळी ठरला होता. मात्र, असे असूनही त्याने हार मानली नाही आणि पुन्हा भारतीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केले.
ट्रेंडिंग न्यूज
डिप्रेशनमुळे संघातील जागा गमावली
एकेकाळी महेंद्रसिंग धोनीसोबत विकेट कीपिंग करणाऱ्या दिनेश कार्तिकची कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात आल्याचे दिसत होते. २०१२ मध्ये दिनेश कार्तिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. कार्तिकने या घटनेला सार्वजनिक स्तरावर जास्त महत्व दिले नाही, पण तो आतून तुटला होता. तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर होऊ लागला. याच कारणामुळे तो टीम इंडियातून बाहेर फेकला गेला.
अभिषेक नायरनं घडवला बदल
कार्तिक अशा अवस्थेत असल्याचे समजल्यानंतर त्याचा मित्र आणि या परिस्थितीतून त्याला बाहेर काढणारा मेंटॉर अभिषेक नायर Abhishek Nayar) एक दिवस त्याच्या घरी पोहोचला. दिनेश कार्तिकची वाईट अवस्था पाहून अभिषेकने त्याला नैराश्यातून बाहेर काढण्याचा निर्धार केला. त्याने कार्तिकला पकडून थेट मुंबईत आणले. कार्तिकने नकार दिला, पण नायरने त्याचे ऐकले नाही. यानंतर कार्तिकच्या आयुष्यात बरेच बदल होऊ लागले.
दीपिकाच्या एन्ट्रीनं कार्तिकचं आयुष्य बदललं
याच काळात भारतीय स्क्वॉश चॅम्पियन दीपिका पल्लीकलची (Dipika Pallikal) आणि कार्तिकची भेट झाली. दिनेश कार्तिकची अवस्था पाहून दीपिकानेही त्याचे समुपदेशन सुरू केले.
दोघांच्या समुपदेशनाने दिनेश कार्तिकच्या मानसिक आणि शारिरिक अवस्थेत सुधारणा होऊ लागली. त्याने नेट प्रॅक्टिससुद्धा सुरू केली. या काळात कार्तिक आणि दीपिका एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्नही केले.
टीम इंडियात कमबॅक
क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना दिनेश कार्तिकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली. याचा फायदा त्याला आयपीएलमध्ये मिळाला. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपला कर्णधार बनवले. २०२० मधील निदहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ८ चेंडूत २९ धावा करून स्वतःला सिद्ध केले.
२०२२ मध्ये, कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात घेतले. आयपीएल २०२२ मध्ये कार्तिकने अनेक मॅचविनिंग इनिंग खेळल्या. या कारणाने त्याला २०२२ च्या वर्ल्डकपमध्ये संधी मिळाली. २०२३ च्या आयपीएलमध्येही कार्तिक आरसीबी संघात होता. त्याला सीझनमध्ये काही खास करता आले नाही.