
भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा १६ धावांनी पराभव करत मालिका ३-० अशी जिंकली. महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा हा शेवटचा सामना होता. झुलनची दिवसभर चर्चा होती, मात्र सामन्याच्या शेवटी दीप्ती शर्मा चर्चेत आली. लॉर्ड्सवर भारताची दिग्गज ऑलराऊंडर दिप्ती शर्माने इंग्लंडची फलंदाज शार्ली डीनला मांकडिंगद्वारे धावबाद केले. यावर बरीच चर्चा रंगली.
दिप्ती शर्माने जे केले ते खेळ भावनेच्या विरुद्ध- इंग्लंडची कर्णधार
दरम्यान मांकडिंग नियमावरुन अनेक वादही झाले आहेत. आता इंग्लंडच्या कर्णधाराने भारतीय खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. "दिप्ती शर्माने जे केले ते खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याचे इंग्लंडची कर्णधार अॅमी जोन्सचे म्हणणे आहे. तर भारतीय कर्णधार हरमनप्रीतने दिप्ती शर्माची पाठराखण केली आहे. जे आयसीसीच्या नियमात आहे, तेच दिप्तीने केल्याचे हरमनप्रीत म्हणाली.
दीप्ती शर्माचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक
मात्र, या सगळ्यात भारतीय चाहते दीप्ती शर्माचे भरभरून कौतुक करत आहेत. दीप्तीच्या या मांकडिंगलक बरेच मीम्स बनवले जात आहेत. काही चाहते दीप्तीला 'लेडी अश्विन' म्हणत आहेत तर काही जण 'लगान' चित्रपटाचा फोटो शेअर करत आहेत, ज्यात इंग्लिश गोलंदाज मांकडिंगद्वारे भारतीय खेळाडूला धावबाद करत आहेत. चाहत्यांनी हा फोटो शेअर करुन लिहिले आहे की, “लगानचा बदला पूर्ण झाला”.
४४ व्या षटकांत नेमकं काय घडलं
इंग्लंडला विजयासाठी ४० चेंडूत १७ धावांची गरज होती. ४४ वे षटक भारताची दिग्गज ऑलराऊंडर दिप्ती शर्मा टाकत होती. शार्ली डीन ही शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिससह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्या षटकातील चौथ्या चेंडूवर नॉन स्ट्रायकर एंडला उभी असलेली डीन चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर पडली. त्यामुळे दीप्तीने चाणाक्षपणा दाखवत बेल्स उडवल्या.
त्यानंतर भारतीय खेळाडूंनी धावबाद (मांकडिंग) साठी अपील केले. यावेळी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. रिप्लेत डीनने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी डीनला धावबाद घोषित केले. धावबाद झाल्यानंतर भारतीय संघाने जल्लोष सुरू केला . तर इंग्लिश खेळाडू यामुळे प्रंचड नाराज दिसले. डीन आणि फ्रेया डेव्हिस यांच्या डोळ्यात अश्रूही आले होते.
संबंधित बातम्या
