भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २२०४ मध्ये त्याच्या मागील टोकियो ऑलिम्पिक इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज आहे. नीरज चोप्राच्या खेळाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नीरज चोप्राची पात्रता फेरी ६ ऑगस्टला होणार आहे.
पण याआधीच एक विचित्र भारतीय चाहता त्याला चिअर करण्यासाठी चक्क पॅरिसमध्ये पोहोचला आहे. चाहत्याला विचित्र म्हणण्याचे कारण म्हणजे, तो विमानाने नाही तर नीरज चोप्राला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या सायकलवरून पॅरिसला पोहोचला आहे. फैस असरफ अली असे त्या चाहत्याचे नाव आहे.
अलीने जवळपास दोन वर्षांत केरळ ते फ्रान्सची राजधानी सायकल चालवली आहे. फैस असराफ अलीने १५ ऑगस्ट २०२२ रोजी कालिकत, केरळ ते पॅरिस असा सायकलिंग प्रवास सुरू केला. जवळपास २२,००० किलोमीटरचे अंतर कापत ३० देशांचा प्रवास करून तो पॅरिसला पोहोचला आहे.
अली 'शांतता आणि एकतेचा' संदेश देत भारत ते लंडन सायकल मिशनवर निघाला होता. या काळात १७ देशांत सायकलिंग केल्यानंतर गेल्या वर्षी १ ऑगस्ट रोजी दुपारी तो बुडापेस्टमध्ये थांबला तेव्हा त्याला कळले की टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू तिथेच थांबला आहे.
चोप्रा वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी खेळाडूंच्या ताफ्यासह तेथे होते. अलीने केरळमधील एका प्रसिद्ध प्रशिक्षकाला फोन केला आणि भारतीय संघाला भेटायचे असल्याचे सांगितले आणि तेव्हाच त्याला त्याच्या आवडत्या स्पोर्ट्स स्टारला भेटण्याची संधी मिळाली.
"मला भारतीय खेळाडूंशी बोलण्यासाठी काही मिनिटे मिळाली आणि त्यावेळी नीरजने मला सांगितले की जेव्हा तुम्ही लंडनला जात आहात, तेव्हा ऑलिम्पिकसाठी पॅरिस का येत नाही,"
फैस असरफ अलीने 'इंडिया हाऊस' येथे भेट संपल्यानंतर सांगितले. मला वाटले की पॅरिसमध्ये त्याला पुन्हा भेटण्याची ही एक उत्तम संधी असेल. त्यामुळे मी माझा प्लॅन थोडा बदलला आणि आवश्यक व्हिसा मिळवला आणि इथे माझा प्रवास संपण्यापूर्वी सायकलने ब्रिटनला गेलो.
व्यवसायाने अभियंता असलेला अली त्याच्या सायकलसोबत चार जोड कपडे, एक तंबू आणि एक 'स्लीपिंग बॅग' घेऊन जातो, ज्यामुळे त्याच्या सामानाचे आणि सायकलचे एकूण वजन सुमारे ५० किलो होते.
तो म्हणाला, 'मी त्याला पुन्हा भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी पीटी उषा मॅडम यांना विनंती केली आहे. त्याला पुन्हा इतिहास रचताना पाहण्यासाठी मी येथे आलो आहे.
अली पुढे म्हणाला, 'मी कधीही कोणत्याही हॉटेलमध्ये राहत नाही आणि वाटेत मला काही प्रायोजक मिळतात. मधल्या काळात व्हिसाची व्यवस्था करण्यासाठी मला दोनदा केरळला जावे लागले. तुम्हाला फक्त सीमा ओलांडण्यासाठी व्हिसाची गरज आहे, सायकलस्वाराला इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही.’’
अलीला या काळात थकवा किंवा आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला का असे विचारले असता तो म्हणाला, नाही, कधीच नाही. लोक माझे सर्वत्र प्रेम आणि प्रेमाने स्वागत करतात आणि त्यामुळे मला प्रेरणा मिळते. मी येथे खूप उत्साहित आहे.'
अलीने सांगितले की, लंडनमध्ये ख्रिस गेल, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.