मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022: शाब्बास इंडिया! कॉमनवेल्थमध्ये 'हा' विक्रम करणारा भारत ठरला चौथा देश

CWG 2022: शाब्बास इंडिया! कॉमनवेल्थमध्ये 'हा' विक्रम करणारा भारत ठरला चौथा देश

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 10, 2022 11:52 AM IST

१९५८ मधील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पहिले सुवर्ण जिंकले होते. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी हे सुवर्ण जिंकले होते. तेव्हापासून भारताने प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

CWG
CWG

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा समारोप झाला आहे. या खेळाच्या ११व्या दिवशी भारतीय संघाने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. भारतासाठी पीव्ही सिंधूने सोमवारी शेवटच्या दिवशी बॅडमिंटन महिला एकेरीत सुवर्ण पदक जिंकले. सिंधूच्या या सुवर्ण पदकानंतर राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासातील भारताचे हे २०० वे सुवर्णपदक ठरले आहे.

कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात २०० सुवर्णपदके जिंकणारा भारत हा केवळ चौथाच देश आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये १००३ सुवर्णपदके जिंकून या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे इंग्लंड (७७३) दुसऱ्या तर कॅनडा (५१०) तिसऱ्या स्थानावर आहे.

बर्मिंगहॅम गेम्समध्ये भारताने २२ सुवर्णपदके जिंकली. यानंतर कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या नावावर आता एकूण २०३ सुवर्ण पदके झाली आहेत.

बर्मिंगहॅम गेम्समध्ये ११व्या दिवशी बॅडमिंटन पुरुष एकेरीत सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेन, तर पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग सेट्टी या जोडीने सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर अचंता शरत कमलने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

१९५८ मधील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पहिले सुवर्ण जिंकले होते. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी हे सुवर्ण जिंकले. तेव्हापासून भारताने प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. (१९६२ आणि १९८६ मध्ये भाग घेतला नाही). तर २०१० दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स भारतासाठी सर्वात यशस्वी ठरले. भारताने दिल्ली कॉमनवेल्थमध्ये ३८ सुवर्णपदके जिंकली होती.

भारताने २२ सुवर्णांसह ६१ पदके जिंकली

यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने २२ सुवर्णांसह एकूण ६१ पदके जिंकली आहेत. यात १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचाही समावेश आहे. भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला. बर्मिंगहॅम गेम्सच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (८ ऑगस्ट) भारताने चार सुवर्णांसह एकूण ६ पदके जिंकली. आता पुढील कॉमनवेल्थ गेम्स चार वर्षांनंतर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे होणार आहेत.

भारताला सर्वाधिक पदके कुस्तीत 

यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी १२ पदके जिंकली, ज्यात ६ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये १० पदके आली. तर बॉक्सिंगमध्येही भारताने तीन सुवर्णांसह ७ पदके जिंकली आहेत.

WhatsApp channel