मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs GT IPL 2023 : चेन्नई की गुजरात, फायनलचं तिकीट कुणाला, गुरु-शिष्याच्या लढाईत कोण मारणार बाजी?

CSK vs GT IPL 2023 : चेन्नई की गुजरात, फायनलचं तिकीट कुणाला, गुरु-शिष्याच्या लढाईत कोण मारणार बाजी?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 23, 2023 10:08 AM IST

CSK vs GT IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमधील पहिला सेमिफायनल सामना आज होणार आहे. गुजरात आणि चेन्नई फायनलच्या तिकीटासाठी भिडणार आहे.

CSK vs GT Semi Final IPL 2023
CSK vs GT Semi Final IPL 2023 (HT)

CSK vs GT Semi Final IPL 2023 : गुजरात टायटन्सने आरसीबीला पराभूत केल्यामुळं मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता आजपासून आयपीएलमधील नॉकआऊट सामन्यांना सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज पहिला सेमीफायनल सामना होणार आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्याच्या संघाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यामुळं आता आजच्या सामना जिंकत कोणता संघ यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा हे चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या दोन सामन्यांत शुभमनने विस्फोटक शतकी खेळी केली आहे. याशिवाय हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर हे मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत असल्याचं दिसून येत आहे. मोहम्मद शामी, नूर अहमद आणि राशीद खान यांच्यावर गुजरातच्या गोलंदाजीची मदार अवलंबून आहे. दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्व्हॉय हे फलंदाज कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहेत. शिवम दुबे, रवींद्र जडेजा, धोनी आणि अंबाती रायडू हे मधल्या फळीत विस्फोटक फलंदाजी करत आहे. त्यामुळं सीएसकेला मोठा स्कोर करायचा असेल अथवा मोठ्या धावांचा पाठलाग करायचा असेल तर सलामीवीरांनी मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं असणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्जची संभावित प्लेईंग इलेव्हन-

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वॉय, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथिराना, तुषार देशपांडे आणि मिचेल सॅटनर

गुजरात टायटन्सची संभावित प्लेईंग इलेव्हन-

हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि यश दयाल

WhatsApp channel